
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेटाळून लावले. तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत. तुमचे फटाके भिजले होते म्हणून आवाज आले नाहीत. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डला हाताशी धरून मुंबईला कसे वेठीला धरले होते त्याचा भंडाफोड मी उद्या सकाळी करून हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी गोवावाला कम्पाऊंमधील जागेच्या खरेदी व्यवहारावरून केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना नवाब मलिक म्हणाले की, त्या जागेवर मदिनेत्तूल आमान को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. 1984मध्ये बिल्डिंग बांधण्यात आली. यामध्ये मुनिरा प्लंबर यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देत त्या ठिकाणी 140 ते 150 घरे बांधून सर्वसामान्यांना विकली. त्या ठिकाणी आमचे एक गोडाऊन आहे. मुनिरा यांनी मागील तीस वर्षांपासून गोडाऊन भाडय़ाने दिले आहे. आमचीही या प्राँपर्टीमध्ये चार दुकाने होती. 9 नोव्हेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीत मी विजयी झालो होतो त्यावेळी माझे निवडणूक कार्यालय गोवावाला कम्पाऊंड बिल्डिंगमध्येच होते. तेव्हा आम्ही भाडय़ाने जागा घेतली होती. त्यानंतर गोडाऊनचा मालकी हक्क मागितला आणि त्यांच्याकडून गोडाऊनची मालकी घेतली. या काळात पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेल यांच्याकडून खरेदी केली त्याची सर्व कागदपत्रे आहेत. त्याची किंमतही आम्ही दिली आहे.
शहावली खानचे वडील वॉचमन
सरदार शहावली खान यांच्यासंदर्भात केलेल्या आरोपावरही नवाब मलिक यांनी उत्तर दिले. गोवावाला कम्पाऊंडमध्ये शहावली खानचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. त्या ठिकाणी त्यांनी 300मीटर जागा ताब्यात घेतली होती. आम्ही जागेचा व्यवहार केला तेव्हा ते आमच्या लक्षात आले म्हणून आम्ही शाहवली खान यांना पैसे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडून माहिती घेतली असती तर आम्ही जागेच्या व्यवहाराची कागदपत्रे दिली असती. आम्ही अंडरवर्ल्डच्या कोणत्याही व्यक्तीकडून जमीन खरेदी केलेली नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही 1999मध्ये मुंबईत प्रथम आमदार होऊन आलात. तुमच्या आधी गोपीनाथ मुंडे होते. ते दाऊदसोबत लोकांचे नाव जोडत होते. मी मंत्री होतो तेव्हा विधानसभेत गोपीनाथ मुंडे यांचे भाषण होत होते. मात्र 62 वर्षांच्या आयुष्यात आमच्यावर कोणी आरोप लावू शकले नाहीत. आम्ही अंडरवर्ल्डकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप तुम्ही केला पण तुम्हाला माहिती देणारे कच्चे खिलाडी आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला.
तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड करणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिक यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत, तुम्ही सांगितले असते तर मीच तुम्हाला कागदपत्रे दिली असती. तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केला आहे पण तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेत उघड करणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला. मलिक आता उद्या कोणता बॉम्ब फोडणार याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे.
निलोफर मलिक यांचे फडणवीसांना कोर्टात आव्हान
ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांच्यावर खोटे आरोप केल्याच्या मुद्दय़ावरून नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्या कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत.
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज प्रकरणात आरोप केले होते. त्याचा उल्लेख करीत नवाब मलिक म्हणाले की, माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केला होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण प्रत्यक्षात पंचनाम्यात व आरोपपत्रात त्याचा उल्लेखही नाही. असे असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी खोटे आरोप केले. त्यामुळे माझी मुलगी निलोफर मलिक ही देवेंद्र फडणवीस यांना उद्या कायदेशीर नोटीस बजावणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले. समीर खान यांना आठ महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती.


























































