वेब न्यूज – चंद्रावर शेती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या चांद्रयानाच्या अभूतपूर्व यशानंतर काहीशी दुर्लक्षित झालेली चीनची अंतराळ मोहीमदेखील आता चर्चेत आली असून चीन या मोहिमेच्या निमित्ताने कशाचा अभ्यास करणार आहेत, काय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत यासंदर्भात लोक उत्सुकतेने प्रश्न विचारू लागले आहेत. हिंदुस्थानच्या चांद्रयान मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असल्याने चीनची अंतराळ मोहीम फारशी चर्चेत आली नाही मात्र अभ्यासकांनी जेव्हा या मोहिमेची वैशिष्टय़े आता उघड करायला सुरुवात केली आहे, तेव्हा लोक आश्चर्यचकित होत आहेत.

अंतराळ स्पर्धेत चीन कायम काही ना काही नवे करण्याचा, आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत असतो. अंतराळात कृषी तंत्रज्ञान किती उपयोगाचे आहे यावर चीन गेली काही वर्षे सखोल अभ्यास करत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून चीनने नुकत्याच पार पाडलेल्या अवकाश मोहिमेत आपल्या स्वतःच्या तियांगोंग अंतराळ स्थानकावर शंभरपेक्षा जास्त बियाणी पाठवली आहेत. यामध्ये 47 प्रकारची शेतबियाणी, गवत, फुले आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. शेतबियाण्यांमध्ये 12 अन्नधान्य आणि 28 नगदी पिकांचा समावेश आहे. त्यासोबत काही शैवाल, खाद्य कवक असे काही सूक्ष्म जीवदेखील अंतराळ स्थानकात अभ्यासासाठी पाठवण्यात आले आहेत.

‘शेनझोऊ-16’ असे या अंतराळ मोहिमेचे नाव आहे. 1980 पासून चीन अंतराळात प्रजननाच्या संदर्भात विविध प्रयोग राबवीत आहे. हे सूक्ष्म जीव त्याच प्रयोगाचा एक हिस्सा असतील. अशाच प्रकारचे प्रयोग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरदेखील चालू आहेत. यापूर्वी चीन चंद्रावर रोप उगवण्यात यशस्वी झालेला आहे. चीनच्या ‘ई-4’ या अंतराळयानाने एक खास प्रकारचा डबा चंद्रावर उतरवला होता. कापसाचे बीज त्यातून पाठवण्यात आले होते. चंद्रावर कोणतीही जैविक गोष्ट पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. दुसरीकडे नासाच्या अंतराळ स्थानकात विविध रोपे आणि पालेभाज्या उगवण्यात यश मिळाले असले तरी त्यांनी प्रत्यक्ष चंद्रावर असा कोणताही प्रयोग केलेला नाही.