खंडणी उकळण्यासाठी समीर वानखेडेंनी आर्यनचे अपहरण केले! नवाब मलिकांचा आरोप

समीर वानखेडे यांनी आर्यन खान याचे खंडणी उकळण्यासाठी अपहरण केले होते असा आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपाची चौकशी करण्यासाठी आपण विशेष तपास पथक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी केली होती असेही मलिक यांनी म्हटले आहे. शनिवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.

मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘ समीर दाऊद वानखेडे यांनी आर्यन खान याचे खंडणीसाठी अपहण केले होते, याची SIT द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मी मागणी केली होती. राज्य आणि केंद्राची मिळून 2 विशेष तपास पथके तपास करत असून यातील कोणते पथक राज्यातील जनतेसमोर सगळं सत्य आणते हे पाहायचे आहे’.

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेतला

कॉर्डिला क्रूझवर अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन होत असल्याच्या संशयावरून एनसीबीने भर समुद्रात असलेल्या बोटीवर छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह अन्य काही आरोपींना अटक करण्यात आली होती. ही कारवाई बोगस असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यांनी नवनवे आरोप करत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

समीर वानखेडे यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाल्याने त्यांच्या तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. एनसीबीचे उप महासंचालक मुथा अशोक जैन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्लीमधील एनसीबी कार्यालय करणार आहे. क्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास वानखेडे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पथकाकडून काढून घेण्यात आला असला तरी ते यापुढेही विभागीय संचालक पदावर कार्यरत राहणार आहेत.

जनसत्ता या वर्तमानपत्राने हा तपास एनसीबीच्या दिल्ली कार्यालयाकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले आहे. वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह अन्य पाच प्रकरणांचा तपासही काढून घेण्यात आला आहे. आता या प्रकरणांचा तपास एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह करणार आहेत. जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांनी त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पथकाकडून काढून घेण्यात आल्याचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.

तर दुसरीकडे हे वृत्त प्रसारित होताच, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करून अजून 26 प्रकरणांचा तपास होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, यंत्रणेच्या स्वच्छतेसाठी अजून बरंच काही करणं गरजेचं आहे आणि आपण ते करू, असंही मलिक त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.