माझ्या नावावर एकही घर नाही, त्यामुळे ईडी चौकशीचे काहीच वाटत नाही- जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण कोणाकडून पैसे घेतलेले नाहीत. त्यामुळे मला रात्री शांत झोप लागते. या पृथ्वीवर माझ्या नावावर एकही घर नाही. यामुळे ईडी चौकशीची आपल्याला काहीच वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. नेर्ले (ता. वाळवा) येथील विकास सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या नावावर पूर्ण पृथ्वीवर एकही घर नाही. सांगलीतील घर वडील राजारामबापू पाटील यांच्या नावाने होते. त्यांच्या पश्‍चात ते घर आईच्या नावे झाले असून आता आईच्या पश्‍चात नाव बदलण्याचे काम सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेती आहे. मात्र, त्याच्या वाटण्या झालेल्या नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करण्यावर आपण भर देत आलो आहोत. सत्ताधारी पक्षाविरोधात बोलणार्‍यांना अडकविण्याचे काम सध्या सुरू असून मी अशा चौकशीला भिण्याचे काहीच कारण नाही. सत्ताधारी भाजपविरोधात लोकामध्ये तीव्र असंतोष असून आता आपण केवळ निवडणुकीचीच वाट पाहात आहोत. या निवडणुकीत मतदारच भाजपला योग्य ते उत्तर देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.