अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाविरोधात ‘इंडिया’च्या खासदारांचे आंदोलन

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाविरोधात विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाचे सगळे खासदार एकवटले आहेत. या खासदारांनी संसक परिसरात आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.

लोकसभेतील काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा मुद्दा शुक्रवारी राज्यसभेतही गाजला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, नीरव मोदीचे नाव घेतल्याने आमच्या नेत्याला निलंबित करण्यात आले. खरगे म्हणाले की, एवढ्या छोट्या गोष्टीवर कोणी निलंबन करतो का ? काँग्रेस नेते या निलंबनामुळे संतापले असून काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत. इतकंच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी दुपारी 3 वाजता या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सभागृहातील चर्चेदरम्यान एखाद्या सदस्याने असंसदीय शब्द वापरल्यास त्याला तिथेच अडवलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यावरही आक्षेप घेतला जाऊ शकतो , पण तुम्ही आमच्या नेत्याला लोकसभेत निलंबित केले आहे. खर्गे यांनी पुढे नीरव या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले की, नीरव म्हणजे शांतता , पण तुम्ही अधीर रंजन चौधरी यांना नीरव शब्द उच्चारल्याने निलंबित केले.

‘इंडिया’ आघाडीच्या  खासदारांनी संसद परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत आंदोलन करण्याचा हा निर्णय घेण्यात आला होता. काँग्रेसचे लोकसभा खासदार मणिकम टागोर यांनी निलंबनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती पीटीआयने दिली आहे .