
वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांना आतापर्यंत झालेल्या दोन लढतींत पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील या दोन्ही संघांची अवस्था ‘जिंका किंवा बॅगा भरा’ अशी झाली आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत या दोन्ही संघांना विजयाची गरज आहे. त्यामुळे उभय संघांमधील सुपर-12 लढतीत शुक्रवारी जो संघ पराभूत होईल, त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेले असेल. त्यामुळे उद्याची सामना म्हणजे विंडीज-बांगलादेश यांच्यात अस्तित्वाची लढाई असेल.
स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत वेस्ट इंडीजला इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे बांगलादेशला इंग्लंड व श्रीलंकेने हरवले. विजयाची पाटी अद्यापि कोरीच असलेल्या विंडीज व बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी विजयाची गरज आहे.
विंडीजच्या प्रमुख खेळाडूंना खेळावे लागेल
वेस्ट इंडीजच्या संघातील कर्णधार कायरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, आंद्रे रस्सेल, सिमरॉन हेटमायर व ड्वेन ब्राव्हो हे एकहाती सामना जिंकून देणारे खेळाडू मागील दोन्ही लढतींत अपयशी ठरलेले आहे. हे धोकादायक खेळाडू आपल्या लौकिकास जागल्यास विंडीज कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करू शकतो. अनुभवी जेसन होल्डर संघात दाखल झाल्याने विंडीजची ताकद थोडी वाढलीय. मात्र इंग्लंडविरुद्ध केवळ 55 धावांत गारद झालेल्या विंडीजच्या फलंदाजांचा बांगलादेशच्या गोलंदाजीपुढेही कस लागणार आहे.
बांगलादेशला चांगल्या सुरुवातीची गरज
बांगलादेशची सलामीची जोडी फ्लॉप ठरत आहे. शिवाय त्यांचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला फलंदाजीत अद्यापि करामत करता आलेली नाही. शाकिबसह मोहम्मद नईम, लिटन दास, कर्णधार महमूदुल्लाह व मुशफिकर रहीम असा प्रतिभावान फलंदाजीक्रम बांगलादेशच्या दिमतीला आहे. शिवाय मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन व डावखुरा वेगवान गोलंदाज शोरफुल इस्लाम असा जबरदस्त गोलंदाजी ताफा बांगलादेशकडे आहे. त्यामुळे उद्या ‘जिंका किंवा मरा’च्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
आजच्या लढती
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडीज
गट 1 – शारजा,
दुपारी 3ः30 वाजता
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान
गट 2 – दुबई,
रात्री 7ः30 वाजता
संभाव्य उभय संघ ः
केस्ट इंडीज ः कायरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, ड्केन ब्राक्हो, रोस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, एकिन लुईस, जेसन होल्डर, लेंडल सिमन्स, रवी रामपॉल, आंद्रे रस्सेल, ओशेन थॉमस, हेडन कॉल्श ज्युनियर, अकील हुसैन.
बांगलादेश ः महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, मोहम्मद नईम, महेदी हसन, शाकिब अल हसन, सौम्या सरकार, मुशफिकुर रहीम, नुरूल हसन, अफीफ हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शमीम हुसैन, मुस्तफिजुर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन. शोरफुल इस्लाम.



























































