
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.सरकारने आश्वासन देऊनही मराठा समाजाला अद्याप आरक्षण दिलेले नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या एका आश्वासनाची आठवण करून देत चांगलेच सुनावले आहे. सुरुवातीच्या काळात सर्वोच्च न्यायालयात जे विधेयक मांडले गेले ते जाणीवपूर्वक मराठा आरक्षण विधेयक कमजोर व्हावे असा प्रयत्न केला गेला. आता तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे आरक्षण जे आहे ते तुम्ही मिळवून दाखवा, उगाच इतरांना कशासाठी दोष देत आहात, असा सवाल करत खडसे यांनी केंद्राने यात हस्तक्षेप करून घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावे, असे म्हटले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितलं होते की जर मी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन. अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असेही खडसे यांनी फडणवीस यांना सुनावले आहे. आता मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा टोलाही खडसे यांनी लगावला.
सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जात असेल. मात्र ज्या ज्या वेळी गिरीश महाजन हे भेटीला गेले आहेत ते फेल ठरले आहेत. विनाकारण शिष्टमंडळ बनून जायचे आणि नाटक करायचे. फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेले तरी तो प्रश्न सुटणार नाही. प्रामाणिक इच्छा असेल तर विधानसभेत प्रस्ताव मंजूर करावा. तो दिल्ली येथे घेऊन जाऊन घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावे. अधिवेशन हे घेतलेच पाहिजे आणि त्यात हा प्रश्न सोडवला पाहिजे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.




























































