
सामना ऑनलाईन । मुंबई
आयआयटी मुंबईमधील संशोधकांना तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या संशोधकांनी लो कॉस्ट लेन्स बनवली आहे. या लेन्सला स्मार्टफोनला जोडून त्याचा मायक्रोस्कोपसारखा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे या मायक्रोस्कोपच्या आधारे आपल्याला बनावट नोटा शोधता येतील तसेच मलेरियाच्या तपासणीसोबतच दूषित पाण्याची देखील तपासणी करता येणार आहे. सामान्यत: उघड्या डोळ्यांना ज्या गोष्टी दिसू शकत नाहीत, त्या सर्व गोष्टी या मायक्रोस्कोपच्या आधारे बघता येणार आहेत.
आयआयटी मुंबईमधील भुवनेश्वरी करुणाकरन या पीएचडीच्या विद्यार्थीनीने, प्राध्यापक सौम्यो मुखर्जी, बायोसायन्स आणि बायो इंजीनिअरींग विभागाचे देबाजानी पौल यांनी मिळून या लेन्सची निर्माती केली आहे. रोबस्ट अँड इनएक्सपेंसिव तंत्रज्ञानाने ही लेन्स स्मार्ट फोन जोडून त्याद्वारे 1.5 मायक्रॉन आकाराची अतिशय सुक्ष्म वस्तू देखील या लेन्सच्या सहाय्याने बघू शकतो. या द्वारे शरीरातील बाधित पेशींची चाचणी करता येणार आहे. तसेच मलेरियाच्या तपासणीसोबतच, दूषित पाणी, शुक्राणू परीक्षण अशा अनेक प्रकारच्या तपासण्या या मायक्रोस्कोपच्या आधारे करता येणार आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या चाचण्यांसाठी महागड्या मायक्रोस्कोप घ्यावा लागत होता. मात्र आयआयटीमधील संशोधकांनी बनवलेल्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने महागड्या चाचण्या केवळ एका रुपयात करणे शक्य होणार असल्याचे या संशोधकांनी सांगितले आहे.




























































