पुढील पावसाळ्यापासून मलेरियाबाबत अॅलर्ट करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळय़ाबाबत भाकीत वर्तवणारे हवामान खाते आता साथीच्या आजारांबाबतही सावध करणार आहे. मलेरिया, डेंग्यू, हैजा यांसारख्या साथरोगांच्या फैलावाचे भाकित हवामान खाते करणार आहे. हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) पुढील पावसाळ्यापासून सर्वप्रथम मलेरियाबाबत अंदाज वर्तवण्यास सुरूवात करेल, अशी माहिती पृथ्वी शास्त्र मंत्रालयाचे एम. राजीवन यांनी शनिवारी दिली.

हिंदुस्थानी विज्ञान अकादमीने ’हवामान आणि जलवायू परिवर्तन पूर्वानुमानसंबंधी झालेली प्रगती’ या विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी राजीवन बोलत होते. आयएमडीने पावसाळा व उन्हाळ्यात डासांच्या प्रादुर्भावातून होणाऱया साथीच्या आजारांचा अभ्यास केला आहे.

मलेरियाचे भाकित करण्यासाठी अवलंबले जाणारे तंत्र डेंग्यू, हैजा यांसारख्या पावसाळी आजारांसाठी वापरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील ’हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग’(एचपीसी) सुविधेची क्षमता सध्याच्या 10 पेटाफ्लॉप्सवरुन 40 पेटाफ्लॉप्सपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे. याची साथीच्या आजारांचे भाकित करण्यासाठी मोठी मदत होईल, असेही राजीवन यांनी सांगितले.

मलेरियाचे 85 टक्के रुग्ण हिंदुस्थानात

मलेरियाच्या गेल्या वर्षीच्या जागतिक पातळीवरील अहवालानुसार, जगभरातील मलेरियाचे जवळपास 85 टक्के रुग्ण एकटय़ा हिंदुस्थानात सापडतात. जंगल, डोंगराळ भाग तसेच आदिवासी वस्ती असलेल्या राज्यांमध्ये मलेरियाचा अधिक फैलाव होतो. या पार्श्वभूमीवर साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी आयएमडीच्या अंदाजाची मोठी मदत होणार आहे.