
उद्या मकरसंक्रांती. तीळगुळाचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित करणारा वर्षाचा पहिला सण. आपल्या प्रत्येक सणवाराचे वैशिष्ट्यै म्हणजे त्यांच्या मुळाशी असलेला आरोग्यविचार आणि ऋतुचक्रानुसार केलेली आहाराची, पक्वानांची आखणी. छोटसे खमंग तिळाचे लाडू. पण तयामागे आरोग्यविचार केवढा…
घरातल्या स्कयंपाकघरातला आणि हिंदुस्थानी पाकशास्त्रातला एक महत्त्वाचा घटक म्हणून तिळाचा उल्लेख होतो. व्यवहारात तिळाचे दोन प्रकार पडतात. 1) काळे तीळ आणि 2) पांढरे तीळ.
उष्णस्य त्वचो हिम स्पर्शे केश्यो बल्यस्य तिळो गुरूः
अल्प मूत्र कडू पाके मेधाग्नी कफ पित्त कृतः
तीळ हा उष्ण, पचायला जड, पाककाली तिखट, स्पर्शाने थंड, कफपित्त वाढवणारे, बुद्धिप्रद, अग्निप्रदीप्तक, बल्क त्वचाप्रसादक आणि केशवर्धक असून लघवीचे प्रमाण कमी करणारा पदार्थ आहे. बाजारात पांढरे तीळ हे दोन प्रकारांत मिळतात. 1) पॉलिश तीळ आणि 2) साधे तीळ. पॉलिश तीळ दिसायला छान दिसतात, पण गुणवत्तेनुसार साधे तीळच जास्त उपयुक्त ठरतात. आधुनिक शास्त्रानुसार तिळामध्ये मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम आणि अत्याधिक ऑण्टिऑक्सिडंट घटकांचा समावेश आहे.
पांढरे तीळ चावून खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. चावून खाल्ल्याने त्यातील स्निग्धतेमुळे हिरड्या मजबूत होतात. याच तिळाचे तेल अंगाला लावणे म्हणजे याला अभ्यंगस्नान म्हणतात.
- रोज तिळाच्या तेलाने अभ्यंग करावा. तो वार्धव्य (अकाली म्हातारपण), श्रम (थकवा), वात यांचा नाश करतो. दृष्टी स्वच्छ करतो. पुष्टी देतो. आयुष्य वाढवतो. निद्रा देतो. त्वचा सुकुमार करतो व शरीर मजबूत बनवतो.
- ‘सूतिका परिचर्या’ (बाळंतपणानंतर पाळावयाचे नियम) यामध्ये तिळाच्या तेलाला खूप महत्त्व आहे. बाळंतपणावेळी जोर देताना आणि अतिरक्तस्राव झाल्यामुळे शरीरात वाताची वाढ होते. हा वाढीव वात दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचे अभ्यंग करावे. शेगडीवर शेक घ्यावा. तीळ, डिंक, खारीक, खोबरे, बाळंतशेपा, तूप, गूळ असे पौष्टिक लाडू खाल्ले तर आईला दूध व्यवस्थित येते व झीज भरून निघते.
- जेवणानंतर भाजके तीळ, बाळंतशेपो, बडीशेप आणि सैंधव मीठ हे प्रमाणात खाल्ल्याने अपचन, गॅस आणि वाताचे विकार हे त्रास दूर होतात.
- लहान मुलांमध्ये वारंवार पोटाचे आजार होत असतात, तर उष्णवेळी त्यांच्या बेंबीमध्ये 4 थेंब तिळाचे तेल सोडावे. हे रोज केल्यामुळे आतड्यांमधील कोरडेपणा दूर होतो. त्यामुळे पोट फुगणे, पोट साफ न होणे इ. आजार बरे होतात व बाळ निरोगी राहते.
- थंडीच्या काळात सर्दी व त्यानंतर खोकला होतो. अशावेळी 1 चमचा तीळ व 2 कप पाणी उकळवून अर्धा कप शिल्लक उरवणे व तो गाळून पिणे. असे दिवसातून दोनवेळा घेतल्यास सर्दी आणि खोकला बरा होतो.
- तीळ हे दह्याच्या निवळीबरोबर घेतल्यास लघवीची जळजळ कमी होते. तीळ, ओवा आणि गुळासह दह्याची निवळी घेतल्यास लघवीला वारंवार जाणे कमी होते.
- तिळाच्या काढ्यामध्ये गूळ एकत्र करून तो घेतल्यास मासिक पाळीच्या तक्रारी, जसे पोटात जास्त दुखणे, गाठी पडणे, अनियमित पाळी, कंबरदुखी या त्रासापासून आराम मिळतो.
- डोकेदुखी होत असेल तर तिळाचे तेल व दूध यांची पेस्ट बनवून त्याचा डोक्यावर लेप करावा.
अभ्यंग आचरेत नित्यं स जरा श्रम कातहा
दृष्टीप्रसाद पुष्टी आयु स्वप्न सुत्वक दाढर्यकृत
गूळ
पूर्वापार स्वयंपाकघरामध्ये गोडवा आणणारा पदार्थ म्हणजे गूळ. हाच गूळ विविध सणांमध्ये वेगळ्या रूपाने पाहायला मिळतो. जसे पुरणाच्या पोळीत, मोदक, तिळाचे लाडू, करंज्या इ. या गुळाचे ग्रंथात नेमके काय वर्णन केले आहे ते पाहूया.
नातिश्लोष्मकरो धौतः सृष्टमूत्रशकृताःगूळः।
प्रभूत कृमि मज्जास्मक मेदो मांस कफोवर।।
स्वच्छ गूळ किंचित कफकारक व मलमूत्रांची शुद्धी करणारा आहे. मलीन गूळ रक्त, मांस, मेद, कफ, कृमी यांना विशेषकरून उत्पन्न करतो. जुना गूळ रुचिकर व पथ्यकारक आहे व नवीन गूळ कफ व अग्निमांद्य उत्पन्न करतो.
- गूळ मुळात उष्ण आहे. म्हणून गुळाचे पदार्थ, जसे पुरणपोळ्या, मोदक, गूळपोळ्या, गुळाच्या करंज्या हे सर्व पदार्थ तुपासोबत खाल्ल्यास उष्णतेचा त्रास होत नाही.
- पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार गूळपाणी देऊन करत असत. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीचा थकवा दूर होतो.
- स्वयंपाकघरातील गृहिणी ही गूळ व शेंगदाणे खात असे. त्यामुळे पूर्वी आजारपणाचे त्रास कमी होते.
- घसा खवखवत असेल तर दोन चिमूट सुंठ, पाव चमचा गूळ व 4 थेंब तिळाचे तेल यांची गोळी तयार करून चघळावी. त्यामुळे घशाची खवखव तर कमी होतेच, त्यासोबत कफ बाहेर पडतो आणि खोकला बरा होतो.



























































