दहशतवादी हल्ल्यापासून महत्त्वाच्या इमारतींचे होणार संरक्षण, सरकारला अहवाल सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अतिमहत्त्वाच्या व उंच इमारतींवर दहशतवादी हल्ला किंवा अन्य आपत्ती आल्यास संरक्षण कसे करावे याबाबत उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने आज सरकारला सादर केला.

अतिमहत्त्वाच्या इमारतींमध्ये रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स, शाळा, देवस्थाने यांचा समावेश आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात तज्ञ समितीने आज हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपवला. समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता सुनील राठोड, वास्तुविशारद संदीप ईश्वरे, एन. आर. शेंडे यावेळी उपस्थित होते.

दहशतवादी हल्ले, मानवनिर्मित आपत्तींमुळे जीवित आणि मालमत्तेची लक्षणीय हानी होते आणि राज्याच्या आर्थिक विकासाला त्याचा फटका बसतो. ही जोखीम कमी करण्यासाठी या अहवालात उपाय सुचवण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये योग्य त्या तरतुदी करण्याचे आदेश दिले होते.