इम्रान खान यांचे हिंदुस्थानला शांततेचे डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
imran khan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांनी अखेरचा श्वास घेतलेल्या पाकिस्तान येथील कर्तारपूर येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी ‘कर्तारपूर साहिब कॉरिडॉर’चे भूमिपूजन केले. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांतील चर्चा थांबवण्यास कारणीभूत ठरलेल्या दहशतवादावर मूग गिळून हिंदुस्थानला शांततेचे डोस पाजले.

एकमेकांशी अनेक युद्ध लढलेले फ्रान्स आणि जर्मनी जर शांततेने, सलोख्याने राहू शकतात, तर हिंदुस्थान-पाकिस्तानच्या बाबतीत ते का घडू शकत नाही, असा सवाल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला. ‘कर्तारपूर साहिब कॉरिडॉर’च्या या भूमिपूजन सोहळय़ाला पाकिस्तानच्या निमंत्रणावरून हिंदुस्थानचे दोन केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर आणि हरदीप पुरी हे उपस्थित होते. या कॉरिडॉरमुळे पाकिस्तानातील कर्तारपूर हे हिंदुस्थानातील पंजाबमधील गुरुदासपूर जिह्याशी जोडले जाणार आहे. त्यामुळे देशातील शीख बांधवांना कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे व्हिसाशिवाय जाता येणार आहे.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांसोबत खलिस्तानी
कर्तारपूर कॉरिडॉरच्या भूमिपूजन समारंभाला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हेसुद्धा उपस्थित होते, मात्र त्यांच्या सोबत मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा निकटचा साथीदार आणि खलिस्तान समर्थक गोपाळ चावला हा होता. त्याने बाजवा यांच्याशी हस्तांदोलन केले.

नवज्योत सिद्धू पुन्हा पाकिस्तानकडे धावले!
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभात सहभागी झालेले पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे कर्तारपूर कॉरिडॉरच्या निमित्ताने पुन्हा पाकिस्तानकडे धावून गेले.

नवजोतसिंग सिद्धू यांनी इथे येऊन पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून निवडणूक लढवावी, ते नक्कीच जिंकतील.
– इम्रान खान, पंतप्रधान

कर्तारपूर कॉरिडॉरला पाकिस्तानने अनेक वर्षांनंतर आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा पुन्हा सुरू होईल, असा त्याचा अर्थ मुळीच नाही.
– सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री

शेजारचे राष्ट्र हिंदुस्थानचे जवान आणि नागरिकांच्या हत्या करत असताना त्या देशात जाण्याचा विचार माझ्या मनाला शिवू शकत नाही. अखेर मी ‘सैनिक’ आहे. निरपराध देशवासीयांच्या हत्या सहन करता येणार नाहीत. नवज्योतसिंग सिद्धू यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचा पाकिस्तानात जाण्याचा निर्णय वैयक्तिक आहे.
– अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री ,पंजाब