ऐतिहासिक! प्रथमच युद्धनौकेवर दोन महिला अधिकारी

शत्रूशी दोन हात करण्यासाठी आता नारीशक्ती पुढे आली आहे. नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्य़ाना तैनात केले जाणार आहे. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीती सिंह यांची हेलिकॉप्टर स्ट्रीममध्ये ‘ऑब्जर्वर’ पदावर निवड झाली आहे. दोघी युद्धनौकेवरील हेलिकॉप्टर्स चालवणार आहेत. या निमित्ताने नौदलात नव्या इतिहासाची नोंद होणार आहे.

कोची येथील ‘आयएनएस गरुडा’वर सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यागी आणि सिंह या दोन महिला अधिकाऱ्य़ाना युद्धनौकेवरील ‘ऑब्जर्वर’ (एअरबोर्न कॉम्बॅटंट्स) पदावरील नियुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  नौदलाच्या युद्धनौकेवर याआधी महिला अधिकाऱ्य़ाचे कार्यक्षेत्र ‘फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट’पर्यंत सिमित होते. याअंतर्गत केवळ एअरक्राफ्टचे टेकऑफ आणि लॅण्डींग केले जात होते. आता त्यापुढे जाऊन महिला अधिकाऱ्य़ाच्या शक्तीला आणखी वाव मिळणार आहे.

राफेलच्या ‘स्क्वॉड्रन’मध्ये महिला फायटर पायलट!

नौदलाबरोबर हवाई दलानेही नारीशक्तीचा सन्मान केला आहे. राफेल जेटच्या ‘गोल्डन अ‍ॅरोज स्क्वॉड्रन’मध्ये महिला फायटर पायलटची निवड केली आहे. हवाई दलाने या महिला पायलटचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र सध्या महिला पायलटला राफेल उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हवाई दलाच्या 10 महिला फायटर पायलटना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यातील एक पायलट 17 स्क्वॉड्रनच्या साथीने राफेलचे उड्डाण करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या