भांगे ऑरगॅनिक स्फोटप्रकरणी चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-संभाजीनगर महामार्गावर खडका फाटा येथे असलेल्या भांगे ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सोमवारी स्फोट झाला होता. या स्फोटाचे कारण आता समोर आले आहे. ऍसिडच्या टाकीला पडलेले छिद्र बुजविताना टाकीत असलेल्या शिल्लक ऍसिडमुळे हा स्फोट झाला होता. या स्फोटात चार कामगार जखमी झाले आहेत. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचा मॅनेजर दीपक विजय तारडे (रा. ब्राह्मणी), महेश चंद्रशेखर सालके (मूळ रा. पुणे, हल्ली रा. नेवासा फाटा), अन्वर शेख (रा. आष्टी, जि. बीड), प्लांट इन्चार्ज राजेंद्र धनाजी फुरडे (मूळ रा. धाराशिव, हल्ली रा. नेवासा फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी किशोर मच्छिंद्र कांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.

भांगे ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ऍसिडच्या टाकीला छिद्र पडले होते. कंपनीच्या मॅनेजरने हे छिद्र वेल्डिंग करून बुजविण्यासाठी काही कामगारांना बोलाविले होते. टाकीत ऍसिड शिल्लक असतानाही टाकीच्या छिद्राला वेल्डिंग करण्यात आले. ऍसिडमुळे तापमान वाढून या टाकीचा प्रचंड स्फोट झाला. या भीषण स्फोटात किशोर  मच्छिंद्र कांडेकर (वय 26, रा. कांगोणी, ता. नेवासा), नंदू हरिभाऊ गांगुर्डे, महेश दशरथ माळी, आशिष हिरालाल जयस्वाल हे चौघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची खबर मिळताच नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले. किशोर कांडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विजय करे तपास करीत आहेत.