सोलापुरात व्यापाऱयाच्या घरी भन्नाट चोरी; आठ बनावट चाव्या वापरून 45 लाखांची रोकड लांबविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दक्षिण कसब्यात एका व्यापाऱयाच्या घरातील 45 लाख रुपयांची रोकड चोरटय़ाने लांबविली आहे. नियोजितपणे केलेल्या या चोरीत त्याने बेडरूमपर्यंत जाण्यासाठी 7-8  बनावट चाव्या वापरल्या आहेत. आशीष पद्माकर पाटोदकर (रा. दक्षिण कसबा, सोलापूर) असे रक्कम गेलेल्या व्यापाऱयाचे नाव आहे.

दक्षिण कसब्यात राहणारे आशीष पाटोदकर हे बडे व्यापारी आहेत. दररोज जमा झालेली रक्कम ते बेडरूममधील कपाटात ठेवतात. मंगळवारी ते कुटुंबीयांसह पुण्यास गेले होते. चोरटय़ाने दरवाजा, बेडरूम, कपाट असे सात ते आठ शिंकरी असलेले लॉकर हे डुप्लिकेट चावीने उघडून 45 लाख रुपये चोरून नेले. यात 500, 200, 100 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. आज सकाळी घरी परतल्यावर ही चोरीची घटना उघडकीस आली.

फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील करीत आहेत. व्यापाऱयाच्या घरातील एवढी मोठी रोकड गायब झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.