कोकणातील जांभ्या दगडाला राज्याबाहेरही वाढती मागणी; चिरेखाणींना मिळतोय चांगला दर

कोकणामध्ये इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडाने आता कोकणची सीमा ओलांडली आहे. चिरेखाणी आणि त्यामधील चिऱ्‍यांना असलेल्या मागणीमुळे या कातळालाही आता उत्तम भाव मिळत आहे. दगडाला घाटमाथ्यावरील कोल्हापूर, मुंबई, पुणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच राज्याबाहेर असलेल्या कर्नाटक, पंजाब राज्यातही कोकणातील चिऱ्याला मागणी वाढत आहे. त्यातून बांधकामासाठी मजबूत, कोरीव वा नक्षीकामासाठी सुलभ असलेल्या या जांभ्या दगडाला पर्यायाने येथील पडीक असलेल्या कातळाला किंमत आली आहे. मंदिरांच्या बांधकामासाठीही आता मोठ्या प्रमाणावर या लाल दगडाचा वापर केला जात असल्याचे पहायला मिळत आहे.

कोकणची ओळख आता पर्यटन , काजू वा हापूस आंब्याचा प्रदेश एवढीच मर्यादित राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये जांभ्या दगडाच्या माध्यमातून कोकणची नवी ओळख निर्माण होत आहे. विविध निसर्ग संपदेसोबतच कोकणामध्ये उंच-सखल असलेल्या डोंगर परिसरामध्ये जांभ्या दगडाच्या कातळाचाही भाग पाहावयास मिळतो. एखाद्या जागेची खरेदी-विक्री होताना जागेमध्ये जास्त प्रमाणात कातळाचा भाग असल्यास त्या जागेची खरेदी करताना खरेदीदार नाक मुरडतो. साहजिकच त्या जागेचा दरही घसरतो. मात्र, या जांभ्या दगडाच्या कातळामध्ये खोदल्या जाणाऱ्‍या चिरेखाणी आणि त्यामधील चिऱ्‍यांना मोठ्या प्रमाणात असलेल्या मागणीमुळे या कातळालाही आता सोन्याचा भाव मिळू लागला आहे.

घाटमाथा परीसर वा मुंबईमध्ये बांधकाम करण्यासाठी सर्रासपणे विटांचा वापर केला जातो. पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी सर्व बांधकामे काळ्या दगडात केली जात असत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये विटांऐवजी बांधकाम व्यवसायिक जांभ्या दगडांना पसंती देताना दिसत आहेत. चिरेखाणींवर काढलेले चिरे पुन्हा आकारबध्द करावे लागत होते. आता चित्र बदलले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई, कोल्हापूर, पुणे , नाशिक आदी भागांमध्ये दररोज सुमारे ऐंशी हजार ते एक लाख जांभ्या दगडाच्या चिर्‍याची विक्री होत असल्याचा अंदाज आहे. सर्वसाधारणतः अठराशे ते दोन हजार रूपये शेकडा दराने ही विक्री होते. त्यातून दरदिवशी कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे. संगमेश्वर , लांजा , राजापूर, रत्नागिरी , चिपळूण आदी तालुक्यातील चिरा परजिल्ह्यामध्ये वाहतूक करून नेला जात आहे.

कातळातून निघणाऱ्या जांभ्या दगडाला आलेली किंमत आणि नेहमीच्या बांधकामासह सौंदर्यपूर्ण घरे, मंदिरे आदींच्या बांधकामासाठी चिऱ्याला आलेली किंमत यामुळे कोकणात माळावर पसरलेल्या सड्याला आता चांगली मागणी आणि अर्थातच किंमत येऊ लागली आहे. कोकणच्या लाल मातीतील चिरा ही वेगळी ओळख दूरवर पसरते आहे. देशावर चिरा जातोच आहे. आता तो पार पंजाबपर्यंत पोहोचला आहे. चिरे काढणारे मजूर, चिरे खाणमालक, वाहतूकदार आणि खरेदीदार अशा साखळीत अर्थचक्र सुरू राहते. चिरे काढल्यानंतर तयार होणाऱ्या रिकाम्या खाणींचाही नामी उपयोग होऊ लागला आहे. मंदिरांची बांधकामे , कमानी , दीपमाळा यासह अनेक आकर्षक आकार उभारण्यासाठी चिऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

मोठी घरे , हॉटेल, मंदीरे, अशा इमारतींच्या बांधकामासाठी जांभ्या दगडांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. जांभ्या दगडांच्या वापरातून इमारतीला आकर्षकपणा येतो. या दगडामध्ये कोरीवकाम वा नक्षीकाम करणेही सुलभ असते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जांभ्या दगडाला मुंबई, कोल्हापूर, पुणे , नाशिक आदि भागातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. येथील चिरा पंजाब राज्यामध्येही पोहचला आहे. त्यातून, दरदिवशी होणार्‍या आर्थिक उलाढालीतून चिरेखाण मालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. सर्वच चिरे आता मशीनकट असल्याने कारागिरांना बांधकाम करणे सोपे झाले आहे . याचबरोबर बांधकाम देखील वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.
– राजू जाधव, चिरेखाण व्यवसायिक देवरुख