कुलदीप, जाडेजाने घेतली ऑस्ट्रेलियाची फिरकी, ऑस्ट्रेलिया 6 बाद 236 धावा  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिडनी 

विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर तिसर्‍याच दिवशी मजबूत पकड मिळविली. कुलदीप यादव व रवींद्र जाडेजा या फिरकीच्या जोडगोळीने शनिवारी तब्बल 51.3 षटके गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे 16 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 83.3 षटकांत 6 बाद 236 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पीटर हॅण्डस्कोम्ब 28, तर पॅट कमिन्स 25 धावांवर खेळत होते. हिंदुस्थानकडून कुलदीप यादवने 3, रवींद्र जाडेजाने 2, तर मोहम्मद शमीने 1 फलंदाज बाद केला.

 

जेवणातून ‘विकेट’बाधा

पहिल्या सत्रात केवळ एक विकेट गमावणार्‍या ऑस्ट्रेलियाने उपाहारानंतर पाच फलंदाज गमावले. कांगारूंना जेवणातून ‘विकेट’बाधा झाली असे गमतीने म्हणावे लागेल. खेळपट्टीवर स्थिरावलेला मार्कस हॅरिस कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावणार असे वाटत होते, मात्र रवींद्र जाडेजाने 43 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हॅरिसला चकवले. झपकन आत आलेल्या चेंडूने त्याच्या बॅटची खालची कड घेऊन लेग स्टम्प उडवला अन् हिंदुस्थानला दुसरे यश मिळाले. हॅरिसने 120 चेंडूंत 79 धावा करताना 8 चौकार लगावले. त्याच्या जागेवर आलेला शॉन मार्श 8 धावा काढून माघारी परतला. त्यालाही जाडेजानेच रहाणेकरवी झेलबाद बाद केले. अष्टपैलू मार्नस लाबुशेन 95 चेंडूंत 7 चौकारांसह 38 धावा करून बाद झाला. मोहम्मद शम्मीच्या गोलंदाजीवर रहाणेने त्याचा अफलातून झेल टिपला.  

डबल धमाका

कुलदीप यादवने चहापानानंतर दोन फलंदाजांना लागोपाठच्या षटकांत बाद करून ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलले. ट्रव्हिस हेडला (20) एका सुरेख चेंडूवर कॉट ऍण्ड बोल्ड करून हिंदुस्थानला पाचवे यश मिळवून दिले. पुढच्याच षटकात त्याने कर्णधार टीम पेनचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. मग पीटर हॅण्डस्कोम्ब व पॅट कमिन्स यांनी हिंदुस्थानी गोलंदाजीचा सावधपणे प्रतिकार करीत आणखी पडझड होऊ दिली नाही. मात्र पावसामुळे 16 षटकांचा खेळ वाया गेल्यामुळे रविवारी अर्धा तास आधी खेळ सुरू होणार आहे.  

पहिल्या सत्रात यजमान सरस

हिंदुस्थानने 7 बाद 622 धावसंख्येवर शुक्रवारी पहिला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरादाखल यजमान ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवसाच्या बिनबाद 24 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मार्कस हॅरिस (79) व उस्मान ख्वाजा (27) या सलामीच्या जोडीने 72 धावांची सलामी देत पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. कुलदीप यादवने उस्मान ख्वाजाला पुजाराकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाने उपाहारापर्यंत 1 बाद 122 धावा केल्या होत्या.

 

राहुलच्या प्रामाणिकपणाचे कौतुक 

फलंदाजीत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलचे क्षेत्ररक्षणातील प्रामाणिकपणाचे भलतेच कौतुक झाले. तिसर्‍या दिवसाच्या पाचव्या षटकात रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर सलामीवीर मार्कस  हॅरिसने मिड ऑनला मोठा फटका मारला. लोकेश राहुलने झेप घेऊन तो आखूड झेल टिपला, मात्र चेंडू टप्पा घेऊन त्याच्या हातात आला होता. बाकीचे हिंदुस्थानी खेळाडू आनंदात राहुलच्या दिशेने धावू लागले, पण त्याच वेळी राहुलने झेल पकडला नसल्याचे कबूल केले. हे पाहून मैदानावरील पंच इयन गुल्ड यांनी राहुलचे कौतुक केले.