
सामना ऑनलाईन । मुंबई
तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. युवा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएलमध्ये आपली छाप पाडलेल्या ऋषभ पंतला पहिल्यांदाच कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. ट्वीट करून याबाबत माहिती देण्यात आली.
TEAM NEWS: #TeamIndia for the first three Tests against England announced #ENGvIND. Bhuvneshwar Kumar aggravated a lower back condition in the 3rd ODI. His condition is being assessed & a call on his inclusion in the Test squad will be made soon. pic.twitter.com/lhlF65VRUP
— BCCI (@BCCI) July 18, 2018
कसोटी संघामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. तसेच एक दिवसीय मालिकेला मुकलेल्या जसप्रीत बुमराहलाही कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. परंतु दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या एक दिवसीय सामन्यात जखमी झाल्याने भुवनेश्वर कुमारला कसोटी संघात स्थान देण्यात आलेला नाही. फिटनेस चाचणीनंतर त्याची निवड करण्यात येईल. निवड समितीने मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरला संघात स्थान दिले आहे, परंतु मुंबईकर रोहित शर्माची निवड करण्यात आलेली नाही.
ऋषभ पंतला संधी
कसोटी क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. नियमीत यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याची निवड करण्यात आलेली नाही. पंतसोबत दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळाले आहे. साहाला दुखापत झाल्यानंतर कार्तिकला अफगानिस्तानविरुद्ध झालेल्या एकमात्र कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. तब्बल ८ वर्षानंतर त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले होते.
पहिल्या तीन कसोटीसाठी टीम इंडिया –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.
हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका –
पहिला कसोटी सामना – १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट (ठिकाण – बर्मिंघम)
दुसरा कसोटी सामना – ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट (ठिकाण – लॉर्डस)
तिसरा कसोटी सामना – १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट (ठिकाण – नॉटिंघम)
चौथा कसोटी सामना – ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर (ठिकाण – साऊथम्प्टन)
पाचवा कसोटी सामना – ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर (ठिकाण – ओव्हल)

























































