
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फिटनेसची चिंता लागून राहिली आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती हा यो यो टेस्टमध्ये फेल झाला आहे. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्या खांद्यालाही दुखापत झाली आहे. राहुल तेवतीया याच्या फिटनेसचा रिपोर्ट येणे बाकी आहे. याप्रसंगी पूर्णपणे फिट नसलेल्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केल्यामुळे हिंदुस्थानच्या सीनियर राष्ट्रीय निवड समितीवर टीका होऊ लागली आहे.
वरुण चक्रवर्ती यो यो टेस्टमध्ये दोन वेळा फेल झाला. यामध्ये दोन किमी धावण्याच्या टेस्टचाही समावेश होता. त्यामुळे आता त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळता येणार नाही. टी. नटराजन दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत उपचार घेत आहे. त्यामुळे तो अखेरच्या टी-20 सामन्यांमध्ये खेळू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राहुल तेवतीया सध्या हिंदुस्थानी संघासोबत सराव करीत आहे. पण त्याचा दुसऱया फिटनेस टेस्टचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.



























































