स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात मणिपूर हिंसाचाराचाही उल्लेख

संसदेत मणिपूरसंदर्भात चर्चेची मागणी केली असता त्यावर बोलणं टाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात मणिपूरमधील हिंसाचाराबद्दलही उल्लेख केला.  मणिपूरसंदर्भात पंतप्रधान बोलायला तयार नसल्याने इंडिया आघाडीने संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यानंतर मोदींनी लाल किल्ल्याच्या परिसरातून देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणामध्ये यांनी मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख केला. मणिपूरमध्ये सध्या शांतता नांदत असल्याची चर्चा असून ती कायम रहावी असे मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणात म्हटले की, “गेल्या काही आठवड्यांमध्ये  देशाच्या काही भागात आणि खासकरून मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, आयाबहिणींची अब्रू लुटली गेली. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथे शांतता नांदत असल्याचे वृत्त कळते आहे.  देश, मणिपूरच्या लोकांसोबत आहे, गेल्या काही दिवसांपासून तिथे नांदत असलेल्या शांततेचे पर्व कायम राहावे ही इच्छा असून शांततेतूनच समस्येवर तोडगा निघेल.”

मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, इतिहासातील काही क्षण असे असतात ज्यांचा प्रभाव शतकानुशतके टिकतो. सुरुवातीला ती घटना लहान वाटते, मात्र ते इतर समस्यांचे मूळ बनते. हजार-बाराशे वर्षांपूर्वी या देशावर हल्ला झाला होता. या घटनेमुळे आपण गुलाम झालो.  तेव्हा एका घटनेचा देशावर एवढा परिणाम होईल हे माहीत नव्हते. ज्याला वाटेल ते येऊन आमच्यावर स्वार झाले.