
गुजरात आणि हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यासोबत एका लोकसभा पोटनिवडणुकीचा आणि सहा पोटनिवडणुकांचा निकालही जाहीर झाला आहे. या सगळ्या जागांवर संमिश्र निकाल पाहायला मिळाले आहेत.
गुजरातमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे आणि काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दोन जागांवर यश मिळालं आहे तर इतर ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विधानसभा जागावर भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे.
मैनपुरी लोकसभा पोटनिवडणूक –
मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभेच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव यांनी विजय मिळवला आहे. डिंपल यादव यांचा तब्बल 288461 मतांनी विजय झाला आहे. यादव यांना 618120 मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपच्या रघुराज सिंह शाक्य यांना 329659 इतकी मते मिळाली आहेत. डिंपल यादव या मैनपुरी मतदार संघाच्या पहिल्या खासदार झाल्या आहेत. डिंपल यादव यांना 64 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर भाजप उमेदवाराला 34 टक्के मतांवर समाधान मानावं लागलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक –
उत्तर प्रदेशमध्ये दोन पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामधील एका जागेवर भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे तर दुसऱ्या जागेवर राष्ट्रीय लोक दल पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत मदन भैया यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. राजकुमारी यांनी 22 हजार मतांच्या फरकाने राजकुमारी यांच्यावर विजय मिळवला आहे. तर रामपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आकाश सक्सेना यांनी समाजवादी पक्षाच्या मोहम्मद आसिम राजा यांचा 34136 मतांनी पराभव केला आहे.
बिहार पोटनिवडणूक –
बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. कुऱ्हानी विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपने 3649 मतांच्या फरकाने विजय नोंदवला आहे. भाजपच्या केदार गुप्ता यांनी जनता दलच्या मनोज सिंह यांचा पराभव केला. नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेतल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
छत्तीसगड विधानसभा पोटनिवडणूक –
छत्तीसगडमधील भानुप्रतापपुर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेसच्या उमेदवार सावित्री मांडवी यांनी भाजपच्या ब्रह्मनंद यांचा 21171 मतांनी पराभव केला.
ओडिशा पोटनिवडणूक-
ओडिशामधील पदमपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. बिजु जनता दलाचे उमेदवार वर्षा सिंह बरिहा यांनी भाजपच्या प्रदीप पुरोहित यांचा 42679 मतांनी पराभव केला.
राजस्थान विधानसभा पोटनिवडणूक –
राजस्थानमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने एकमेव विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. सरदार शहरमध्ये काँग्रेसच्या अनिल कुमार शर्मा यांनी भाजपच्या अशोक कुमार यांचा 26852 मतांनी पराभव केला.

























































