लडाखमध्ये चीनचे प्रयत्न उधळले, एलएसीजवळील सहा डोंगरांवर हिंदुस्थानी जवानांचा कब्जा

कुरापतखोर चीनला ठेचण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराने मागील तीन आठवड्यात वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) सहा उंच ठिकाणी आपली पकड मजबूत केली आहे. या ठिकाणांवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) डोळा ठेवला होता. मात्र त्यांच्या सैन्यांचे प्रयत्न उधळून लावत हिंदुस्थानी जवानांनी सहाही मोक्याच्या उंच डोंगरांवर आपला कब्जा मिळवला आहे. त्यामुळे चीनच्या सैन्याला मोठा झटका बसला आहे.

पूर्व लडाखच्या प्रदेशात हिंदुस्थान-चीनमध्ये गेल्या काही दिवसांत तणावाचे वातावरण आहे. चीनच्या पीएलएने घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याची वेळीच खबर मिळवून हिंदुस्थानी लष्कर चीनचे मनसुबे उद्ध्वस्त करत आहे. हिंदुस्थानी जवानांनी अशाच प्रकारे पीएलएला मागे टाकत 29 ऑगस्ट ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या अवधीत सहा उंच डोंगरावर कब्जा मिळवला. या मोक्याच्या ठिकाणांमध्ये मगर हिल, गुरुंग हिल, रिचेन ला, रेजांग ला, मुखपरी आणि फिंगर- 4 परिसराला लागून असलेल्या ठिकाणाचा समावेश आहे. आमच्या जवानांच्या तुकडीने याठिकाणी आपली पकड मजबूत केली आहे, असे लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

हवेत गोळीबार करून पीएलएला रोखले!

ब्लॅक टॉप आणि हेलमेट टॉप हिल एलएसीच्या चीनकडील बाजूला आहेत, तर हिंदुस्थानी जवानांनी ज्या सहा ठिकाणांवर ताबा मिळवला आहे, ते उंच डोंगर एलएसीच्या हिंदुस्थानकडील बाजूला आहेत. याठिकाणी पाऊल ठेवण्यासाठी पीएलएच्या पुरापती सुरू होत्या. मात्र पँगॉंग सरोवराच्या उत्तर किनाऱयापासून दक्षिण किनाऱयापर्यंतच्या परिसरात हवेत गोळीबार करून पीएलएचे प्रयत्न उधळण्यात आले, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या