
कोरोना महामारीचे संकट हे मोठे आहे. यापासून बचावासाठी जेव्हा कधी कोरोनाची लस उपलब्ध होईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. देशात अनेक कंपन्यांकडून कोरोना लसीची ट्रायल सुरू आहे. येत्या काही महिन्यांत कोरोनावरील लस प्रत्यक्षात बाजारात येण्याचा अंदाज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
हिंदुस्थानात कोरोनाशी पद्धतशीरपणे लढा दिला जात आहे. साथीची तीव्रता पाहून करण्यात आलेले उपाय आणि नियोजनामुळे सर्वदूर कोरोनाचा प्रसार झाला नाही. कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळी सर्वांनी सतर्प राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारची ढिलाई नको, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
कोरोनावरील लस आली नसली तरी पेंद्र सरकारकडून लस वितरणाची तयारी आतापासूनच सुरू आहे. देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सरकारने प्राथमिक टप्प्यात 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी सुमारे 385 रुपये इतका खर्च येईल, असा अंदाजही सरकारी पॅनेलने वर्तवला आहे.

























































