देशात कोरोनाग्रस्त 40; केरळमध्ये पाच, तामीळनाडूत एक रुग्ण सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना पसरतोय. आज केरळमध्ये पाच, तर तामीळनाडूत एक जण पॉझिटिव्ह सापडल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 40 वर गेला आहे. केरळमधील तीन जण नुकतेच इटलीहून परतले होते. तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कात आणखी दोघे जण आल्याने त्यांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, अरुणाचल सरकारने परदेशी पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. परदेशी पर्यटकांना अरुणाचलमध्ये जाण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, पण सरकारने हे परवाना वितरण थांबवले आहे.

दिल्लीत 337 जण वॉर्डमध्ये
दिल्लीत तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. पहिला रुग्ण 105 जणांच्या, दुसरा 168 जणांच्या आणि तिसरा रुग्ण 64 जणांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे या 337 जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

देशभरातील रुग्ण
केरळ – 5
राजस्थान – 17
दिल्ली – 3
आग्रा – 6
गाझियाबाद – 1
तेलंगणा – 1
लडाख – 2
अमृतसर – 2
तामीळनाडू – 3
गुडगाव – 1

पाकिस्तानचे 6.1 कोटी डॉलर्सचे नुकसान
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे जास्तीत जास्त 6.1 कोटी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज आशियाई विकास बँकेने व्यक्त केला आहे. कोरोना व्हायरसचा जगातील अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामाचा अंदाज आशियाई विकास बँकेने नुकताच काढला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानचे कमीत कमी 3.42 कोटी डॉलर्सचे तर जास्तीत जास्त 6.08 कोटी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी पाच दिवसांत 13,157 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मार्च महिन्यातील केवळ पाचच दिवसांत तब्बल 13,157 कोटी रुपयाची गुंतवणूक काढून घेतली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्था संकटात आल्याची धास्ती या गुंतवणूकदारांनी घेतलेली दिसते आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2 ते 6 मार्च या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 8,997 कोटी 46 लाख, तर बाँड बाजारातून 4159 कोटी 66 लाख रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

अजित पवारांचा ‘नमस्कार’
लोकांना वाटेल मी उपमुख्यमंत्री झालो आहे. म्हणून आता हात मिळवत नाही. मात्र तसं काही नाही. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू आहे. त्यामुळे मी हातात हात देणं टाळत असल्याचे अजित पवार यांनी बारामतीत सांगितले, तसेच कोरोना आजाराबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.