IND VS ENG ODI : टीम इंडियासाठी ही वर्ल्ड कपची रंगीत तालीमच

38

सामना ऑनलाईन | नॉटिंगहॅम

इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे मनोधैर्य जबर उंचावलेले आहे. आता  गुरुवारी  नॉटिंगहॅम येथे खेळलेल्या जाणाऱ्या पहिल्या वनडेने तीन वनडे लढतींची मालिका सुरू होणार आहे. क्रिकेटच्या वनडे फ़ॉरमॅटमध्ये यजमान इंग्लंड पहिल्या तर हिंदुस्थान दुसऱ्या गुणांकनावर असल्याने उभय संघांतील ही मालिका अतिशय रोमांचक ठरणार आहे. पुढच्या वर्षी इंग्लंडच्या भूमीत आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रंगणार असल्याने ही वनडे मालिका विराट सेनेसाठी विश्वचषकाची रंगीत तालीमच ठरणार आहे. कारण इंग्लंडच्या खेळपट्ट्या आणि इथल्या वातावरणाचा अनुभव हिंदुस्थानी संघाला घेता येणार आहे.

२०१५ च्या विश्वचषकातील फ्लॉप शोनंतर गेल्या तीन वर्षांत इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच आयसीसी गुणांकनात इंग्लंडने टॉपचे स्थान मिळवले आहे. त्यांच्यापाठोपाठ टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे अॅलेक्स हेल्स, जोस बटलर,कर्णधार इयान मॉर्गन, जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स हे क्रिकेटपटू जबर फॉर्मात आहेत. गेल्या तीन वर्षांत इंग्लंडने ६९ पैकी ४६ वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २०१७ मध्ये त्यांनी टीम इंडियालाही वनडे मालिकेत पराभूत केले होते. त्यामुळे या मालिकेत यशासाठी हिंदुस्थानी संघाला सर्वस्व झोकून द्यावे लागणार आहे.

हिंदुस्थानची मदार विराट ,रोहित, राहुल आणि कुलदीपवर

टीम इंडियाला ही मालिका जिंकणे तितके सोपे नाही. मायदेशात इंग्लंड संघाचा खेळ अधिक बहरतो असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे विजयासाठी हिंदुस्थानला फलंदाजीत कर्णधार विराट कोहली, सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या मोठ्या कामगिरीची तर, गोलंदाजीत वेगवान गोलंदाज उमेश यादव, भुवनेश्वरकुमार आणि फिरकीत चायनामन गोलंदाज कुलदीप यादव व युझवेन्द्र चहल यांच्याकडून चमकदार कामगिरीची गरज आहे. फलंदाजीत रोहित आणि धवन सलामीला येतील तर लोकेश राहुल तिसऱ्या स्थानावर खेळेल. कर्णधार विराट चौथ्या स्थानी फलंदाजी करेल. त्यानंतर मधल्या फळीत सुरेश रैना, अष्टपैलू हार्दिक पांड्या, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे नावाजलेले खेळाडू खेळतील. गोलंदाजीत उमेश यादव, भुवनेश्वरकुमार, शार्दूल ठाकूर किंवा सिद्धार्थ कौल वेगवान माऱ्याची, तर कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल फिरकी माऱ्याची मदार सांभाळतील.

पहिल्या वनडेसाठीचे संघ यातून निवडणार

हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक ), हार्दिक पांड्या, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर.

इंग्लंड – इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, मोईन अली, जो रूट, आदिल रशीद, जॅक बॉल, टॉम कुरेंन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, डेविड विली आणि मार्क वूड.

आपली प्रतिक्रिया द्या