पंत-सुंदर जोडीने सावरले; हिंदुस्थानकडे 89 धावांची आघाडी

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱया दिवसअखेरीस हिंदुस्थान फ्रंटफूटवर उभा आहे. यष्टिरक्षक रिषभ पंत व अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सातव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत हिंदुस्थानचा पहिला डाव सावरला आणि पहिल्या डावात मोलाची आघाडी मिळवून दिली. रिषभ पंतने 101 धावांची खेळी साकारताना इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. हे त्याचे तिसरे कसोटी शतक ठरले. वॉशिंग्टन सुंदरने 60 धावांची खेळी साकारली असून आता त्याच्यासोबत अक्षर पटेल (11 धावा) खेळपट्टीवर खेळत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 205 धावांना प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानने शुक्रवारी 7 बाद 294 धावा केल्या असून आता टीम इंडियाकडे 89 धावांची आघाडी आहे.

पहिले सत्र पाहुण्यांचे

कसोटीच्या दुसऱया दिवशी सकाळी रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा या जोडीने 1 बाद 24 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच याने चेतेश्वर पुजाराला या मालिकेत चांगलेच सतावले आहे. याही डावात त्याच्या स्ट्रेट चेंडूवर चेतेश्वर पुजारा 17 धावांवर पायचीत बाद झाला. जॅक लीचने या मालिकेत चौथ्यांदा त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर बेन स्टोक्सच्या उसळत्या अन् अनप्लेयेबल चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने आपला बळी गमावला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. या मालिकेत तो दुसऱयांदा शून्यावर बाद झाला. रोहित शर्मा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडगोळीने 39 धावांची भागीदारी केली. यामधील अजिंक्य रहाणेचा वाटा होता 27 धावांचा. जेम्स ऍण्डरसनच्या उत्कृष्ट चेंडूवर अजिंक्य रहाणे स्लिपमध्ये उभ्या बेन स्टोक्सकरवी झेलबाद झाला.

रोहितची संयमी खेळी

रोहित शर्मा हा खरेतर वन डे व टी-20 स्पेशालीस्ट म्हणून ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्येही तो आक्रमक फलंदाजी करतो, पण या कसोटीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि चौथ्या डावात पुन्हा टीम इंडियाला फलंदाजी करायची आहे हे डोळ्यांसमोर ठेवून त्याने या डावात संयमी फलंदाजी केली. रोहीत शर्माने 144 चेंडूंत सात चौकारांसह 49 धावा फटकावल्या. खेळपट्टीवर स्थिरावणार असे वाटत असतानाच बेन स्टोक्सच्या झपकन आत येणाऱया चेंडूवर तो पायचीत बाद झाला. त्याचे अर्धशतक एक धावेने हुकले. त्यानंतर रविचंद्रन अश्विनला जॅक लीचने ओली पोपकरवी 13 धावांवर बाद केले.

 

अखेरच्या सत्रात कमबॅक

टीम इंडियाची चहापानापर्यंत 6 बाद 153 धावा अशी अवस्था झाली होती. त्यामुळे यजमानांना पहिल्या डावात आघाडी घेता येईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण रिषभ पंत व वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. अखेरच्या सत्रात टीम इंडियाने कमबॅक केले. रिषभ पंतने 118 चेंडूंत 2 षटकार व 13 चौकारांसह 101 धावांची संस्मरणीय खेळी साकारली. वॉशिंग्टन सुंदरने त्याला उत्तम साथ दिली. जेम्स ऍण्डरसनने रिषभ पंतला जो रूटकरवी झेलबाद करीत जोडी तोडली. वॉशिंग्टन सुंदर 8 चौकारांसह 60 धावांवर खेळत आहे. उद्या कसोटीचा तिसरा दिवस असून आता हिंदुस्थानचे उर्वरित फलंदाज पहिल्या डावात आणखी किती धावांची भर घालताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव सर्व बाद 205 धावा

(बेन स्टोक्स 55 धावा, अक्षर 4/68, अश्विन 3-47).

हिंदुस्थान पहिला डाव शुभमन गिल पायचीत गो. ऍण्डरसन 0, रोहित शर्मा पायचीत गो. स्टोक्स 49, पुजारा पायचीत गो. लीच 17, विराट झे. फोक्स गो. स्टोक्स 0, रहाणे झे. स्टोक्स गो. ऍण्डरसन 27, पंत झे. रूट गो. ऍण्डरसन 101, अश्विन झे. पोप गो. लीच 13, सुंदर खेळत आहे 60, अक्षर खेळत आहे 11, अवांतर 16, एकूण 94 षटकांत 7 बाद 294 धावा. बाद क्रम 1-0, 2-40, 3-41, 4-80, 5-121, 6-146, 7-259 गोलंदाजी ऍण्डरसन 20-11-40-3, स्टोक्स 22-6-73-2, लीच 23-5-66-2, बेस 15-1-56-0, रूट 14-1-46-0.

आपली प्रतिक्रिया द्या