अर्थव्यवस्थेला उभारी; दिवाळीपूर्वी परकीय चलन साठ्यात आठवडाभरात 8 अब्ज डॉलरची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दिवाळी साजरी होत आहे. दिवाळीत देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारी परकीय चलन साठ्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. देशाच्या परकीय गंगाजळीत म्हणजे परकीय चलनाच्या साठ्यात 8 अब्ज डॉलरची वाढ झाली असून परकीय चलनाच्या साठ्याने विक्रम केला आहे. 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठी 568.49 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.

परकीय चलन साठ्यात एका आठवड्यात 7.77 अब्ज डॉलरची विक्रमी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. 30 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 18.3 कोटी डॉलरची वाढ होत तो 560.715 अब्ज डॉलरवर पोहचला होता. परकीय चलन साठ्याचा हा विक्रम आहे.

परकीय संपत्ती म्हणजेच फॉरेन करन्सी अॅसेटमध्ये वाढ झाल्याने परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. हे फॉरेन करन्सी अॅसेट परकीय चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे त्यात वाढ झाल्याने परकीय साठ्यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. या काळात फॉरेन करन्सी अॅसेटमध्ये 6.403 अब्जांची वाढ होत तो 514.742 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. या फॉरेन करन्सी अॅसेटमध्ये युरो, पाऊंड, येन या चलनांचा समावेश असतो. मात्र, ते डॉलरमध्ये मोजण्यात येते. 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्यात 1.328 अब्ज डॉलरने वाढ होत तो 37.587 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.

परकीय चलन साठ्यात झालेली वाढ अर्थव्यवस्थेला उभारी देणारी आहे. या चलनात डॉलरचा सर्वाधिक समावेश असतो. डॉलर या चलनातच जगभरात व्यवहार करण्यात येतात. परकीय चलन साठ्यात वाढ झाल्याने देश जास्त प्रमाणात आयात करू शकतो. त्यामुळे देशाची आयात करण्याची क्षमता वाढून देशाचा व्यापार वाढणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार आहे.