Asian Games – पदकांच्या शतकाचे स्वप्न सत्यात उतरले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात हिंदुस्थानने यंदा प्रथमच पदकांचे शतक पूर्ण केले. एकूण 107 पदकांची लयलूट करीत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. तब्बल 37 वर्षांनंतर पदकतक्त्यात हिंदुस्थानने टॉप-5मध्ये स्थान मिळविले. चीन, जपान व दक्षिण कोरियानंतर हिंदुस्थान चौथ्या स्थानावर राहिला.

यजमान चीनने यंदाच्या आशियाई स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवित 201 सुवर्ण, 111 रौप्य व 71 कांस्य अशी एकूण 383 पदकांची लयलूट केली. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) यंदाच्या आशियाई स्पर्धेत शंभर पदकांचे लक्ष्य ठेवले होते. ‘आयओए’च्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी ‘इस बार, सौ पार’चा नारा दिला होता. 653 खेळाडूंच्या पथकाने आशियाई स्पर्धेतील पदकांच्या शतकाचे स्वप्न सत्यात उतरवले. 2018च्या मागील आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने 70 पदकांची कमाई केली होती. यावेळी हिंदुस्थानी खेळाडूंनी यात आणखी 37 पदकांची भर घालत आपला पदकांचा विक्रम आणखी मोठा केला.

68 वर्षांनंतर सुवर्णपदकांचा विक्रम मोडला होता

नवी दिल्ली येथे 1951 मध्ये प्रथमच झालेल्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने 15 सुवर्णपदके जिंकत पदकतक्त्यात दुसरे स्थान मिळविले होते, मात्र 15 सुवर्णपदकांचा आपला विक्रम मोडण्यासाठी हिंदुस्थानला तब्बल 68 वर्षे प्रतीक्षा करावी लागली.  2018 मध्ये हिंदुस्थानने 16 सुवर्णपदके जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला, मात्र पाचच वर्षांत हिंदुस्थानी खेळाडूंनी हा विक्रम 28 सुवर्णपदकांपर्यंत नेला.

महिलांनी जिंकली 46 पदके

यंदाच्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी जवळपास पुरुषांच्या बरोबरीने पदकांची कमाई केली. कारण मिळालेल्या 107 पदकांपैकी 43 टक्के म्हणजे 46 पदके ही महिला खेळाडूंनी जिंकली, तर 48 टक्के (51) पदके पुरुष खेळाडूंनी जिंकली. 9 पदके ही मिश्र दुहेरीतही मिळाली. म्हणजेच यंदाच्या आशियाई स्पर्धेतील ऐतिहासिक यशात पुरुष व महिला खेळाडूंनी बरोबरीचा वाटा उचलला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नेमबाजी, ऍथलेटिक्समध्ये 48 टक्के पदके

यंदाच्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानी नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी करताना सर्वाधिक 7 सुवर्णपदके जिंकली. नेमबाजीच्या पदकतक्त्यात चीननंतर हिंदुस्थान दुसऱ्या स्थानी राहिला. हिंदुस्थानी नेमबाजांनी दोहातील 2006च्या आशियाई स्पर्धेतील आपला विक्रम यंदा मोडला. त्यावेळी हिंदुस्थानी नेमबाजांनी 3 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कांस्यपदके जिंकली होती. यावेळी नेमबाजीत हिंदुस्थानला 7 सुवर्ण, 9 रौप्य व 6 कांस्यपदके मिळाली. ऍथलेटिक्समध्ये नेहमीप्रमाणे यंदाही अधिक पदके मिळाली. यात 6 सुवर्ण, 14 रौप्य व 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. तिरंदाजीमध्येही हिंदुस्थानने 5 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदकांची कमाई केली.

22 क्रीडा प्रकारात मिळाली पदके

हिंदुस्थानी खेळाडूंनी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली. यात 10 क्रीडा प्रकारात आपल्याला सुवर्णपदके मिळाली. हॉकी, घोडेस्वारी, टेनिस व बॅडमिंटन या खेळातही एक-एक सुवर्णपदक मिळाले. कबड्डी व क्रिकेटमध्ये पुरुष व महिला संघांनी ‘सोनेरी’ यश संपादन केले. याचबरोबर स्क्वॉशमध्येही 2 सुवर्ण मिळाले. नेमबाजी, ऍथलेटिक्स व तिरंदाजीतही हिंदुस्थानी खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे सरस कामगिरी केली.