हिंदुस्थानचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन

503

ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारे, आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱया हिंदुस्थानी संघाचे सदस्य अन् तब्बल 51 वर्षे फुटबॉलशी जोडले गेलेले हिंदुस्थानचे महान फुटबॉलपटू म्हणून ओळखले जाणारे पी. के. बॅनर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

पी. के. बॅनर्जी पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. तसेच दोन मार्चपासून ते व्हेण्टीलेटरही होते. पी. के. बॅनर्जी यांचा जन्म 23 जून 1936 रोजी पश्चिम बंगालमधील जलपेईगुरी येथे झाला. 1951 साली बिहार संघामधून त्यांनी फुटबॉल या खेळाची सुरुवात केली. स्ट्रायकर म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्तम कामगिरी बजावली.

संस्मरणीय पी. के. बॅनर्जी सदस्य असलेल्या हिंदुस्थानी फुटबॉल संघाने 1956 साली मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चौथा क्रमांक पटकावला. तसेच 1962 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने गोल्ड मेडल जिंकण्याची करामत करून दाखवली. 1960 साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पी. के. बॅनर्जी यांच्याकडे हिंदुस्थानचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. सातत्याने होणाऱया दुखापतीमुळे बॅनर्जी यांनी 1967 साली निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली. 54 करंडक जिंकण्यात ते यशस्वी ठरले.

…म्हणून ते पूर्व रेल्वेमधून खेळले

मोहन बागान व ईस्ट बंगाल हे हिंदुस्थानातील दिग्गज क्लब. या दोन क्लब्समधून खेळण्यासाठी प्रत्येक फुटबॉलपटू धडपड करीत असतो. पण पी. के. बॅनर्जी यांनी संपूर्ण कारकीर्दीत पूर्व रेल्वेमधून खेळणेच पसंत केले. यावर त्यांना विचारले असता ते नेहमीच वाक्य म्हणत, जेव्हा मी निवृत्त होईन तेव्हा माझा उदरनिर्वाह कसा होईल. याचा अर्थ पूर्व रेल्वेमध्ये नोकरी करीत त्यांना खेळताही येत होते. यासाठी ते पूर्व रेल्वेमधूनच खेळत राहिले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचे भाग्य

पी. के. बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मला खेळता आले याचे भाग्य समजतो. माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम सामनेही त्यांच्याच अधिपत्याखाली खेळलो. खेळाडूंचा खेळ मैदानात सहज व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असत, असे स्पष्ट मत बायचुंग भुतिया याने व्यक्त केले.

माझ्या कारकीर्दीवरही त्यांचा प्रभाव

सौरभ गांगुली यांनीही पी. के. बॅनर्जी यांच्याबाबत आदरांजली व्यक्त केली. ते यावेळी म्हणाले, मी 18 वर्षांचा असल्यापासून त्यांचा माझ्या कारकीर्दीवर प्रभाव आहे. पी. के. बॅनर्जी यांच्याबद्दल प्रचंड आदर व प्रेम असून माझ्या जवळची व्यक्ती गमावल्याचे दुःख आहे.

आपली प्रतिक्रिया द्या