
टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याआधी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू सुमीत मलिक डोपिंगमध्ये फेल झाल्यामुळे आता त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. याचसोबत हिंदुस्थाननेही कोटा गमावला आहे. 125 किलो वजनी गटात आता सुमीत मलिकऐवजी हिंदुस्थानला इतर कोणताही कुस्तीपटू पाठवता येणार नाही. तसेच कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियावर 16 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
बी सॅम्पलनंतर आपली बाजू मांडणार
सुमीत मलिक ए सॅम्पलमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्याच्या बी सॅम्पलचे परीक्षण केले जाणार आहे. सुमीत मलिकला 10 जूनपर्यंत जागतिक अॅण्टी डोपिंग एजंसीला आवेदन करावे लागणार आहे. बी सॅम्पलचा निकाल आल्यानंतरच सुमीत मलिकला जागतिक अॅण्टी डोपिंग एजंसी व जागतिक कुस्ती फेडरेशनसमोर आपली बाजू मांडता येणार आहे. कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियालाही त्याचप्रसंगी आपली बाजू मांडावी लागणार आहे.
म्हणून आपत्ती ओढवली
सुमीत मलिक बुल्गारिया येथे आयोजित जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता फेरी दरम्यान घेतलेल्या सॅम्पलमध्ये पॉझिटिव्ह सापडला आहे. ही स्पर्धा जागतिक कुस्ती फेडरेशन अंतर्गत घेण्यात आली होती. सुमीत मलिकचे नमुनेही परदेशातील कंपनीकडून घेण्यात आले होते. ऑलिम्पिक नियनानुसार यामुळे देशाला कोटा गमवावा लागतो. सुमीत मलिकचे नमुने हिंदुस्थानातील राष्ट्रीय अॅण्टी डोपिंग एजन्सीकडून घेण्यात आले असते आणि यात तो पॉझिटिव्ह सापडला असता तर देशातील इतर खेळाडूला कोटा देण्यात आला असता, अशी माहिती कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी या वेळी दिली.




























































