RudraM-II क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, ३५० किलोमीटरवरील लक्ष्याचा घेणार अचूक वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि हिंदुस्थानी हवाई दलाने एका हवाई प्लॅटफॉर्मवरून रुद्रम-II या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दिली. विमानातून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल ३५० किलोमीटर इतकी आहे. चाचणीवेळी विमानातून सोडल्यानंतर या क्षेपणास्त्राने ठरवून दिलेल्या लक्ष्यावर अगदी अचूकपणे निशाणा साधला. अत्यंत कठीण परिस्थितीत ही चाचणी घेण्यात आली असून, क्षेपणास्त्राच्या सर्व सिस्टीम योग्य प्रकारे काम करत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. ओडिशातील चांदीपूर येथील केंद्राने नोंदवलेल्या माहितीनुसार, या चाचणीचे सर्व हेतू १०० टक्के यशस्वी झाले आहेत.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, रुद्रम-II हे पूर्णपणे हिंदुस्थानात तयार करण्यात आलेले स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. हैदराबाद येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेने इतर अनेक संस्था आणि एचएएल सारख्या कंपन्यांच्या मदतीने मिळून याची निर्मिती केली आहे.