
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानने बुधवारी ऍण्टी सॅटेलाईट क्षेपणास्त्राद्वारे अंतराळातील आपलाच उपग्रह पाडून नवा इतिहास घडवला. ‘मिशन शक्ती’ ऑपरेशनद्वारे पृथ्वीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडण्याची ही कामगिरी देशाच्या शास्त्रज्ञांनी अवघ्या तीनच मिनिटांत करून दाखवली. जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अंतराळातही युद्ध लढण्यास हिंदुस्थान समर्थ आहे हा संदेश त्यातून जगभरात गेला. ‘मिशन शक्ती’ ऑपरेशन यशस्वी झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून केली.
उपग्रह पाडणारे क्षेपणास्र बाळगणारे देश जगात मोजकेच आहेत; पण अमेरिका, रशिया, चीन या तीन देशांनंतर अंतराळातील उपग्रह पाडण्याची क्षमता सिद्ध करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे. उपग्रहाचा लक्ष्यभेद क्षेपणास्त्राद्वारे करण्याच्या या प्रणालीची चाचणी अमेरिकेने 1958मध्ये केली होती. चीनने ही चाचणी 2007मध्ये तर रशियाने 2015मध्ये ही प्रणाली विकसित केली होती. हिंदुस्थानचे या प्रणालीवरचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (डीआरडीओ) आणि हिंदुस्थानच्या इस्रो यांनी संयुक्तपणे हे काम 2010 सालापासून चालवले होते.
मोहीम तीन मिनिटांत फत्ते
‘‘हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांनी 300 किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमधील म्हणजे पृथ्वीच्या कक्षेतील एका उपग्रहावर मारा करून तो अवघ्या तीन मिनिटांतच काही वेळापूर्वी पाडला,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्याचे आपल्या भाषणातून जाहीर केले. हा क्षण तमाम देशवासीयांसाठी अभिमानाचा आहे, असे सांगून ते म्हणाले की, उपग्रह पाडण्याचा पराक्रम हा देशातच तयार केलेल्या ऍण्टी सॅटेलाईट क्षेपणास्त्राद्वारे केला गेला आहे. शास्त्रज्ञांच्या या कामगिरीमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. देशाच्या शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान वाटतो, अशा शब्दांत मोदी यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला.
पाकिस्तानचा जळफळाट
हिंदुस्थानचे ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्यानंतर त्याचे पडसाद जगभरात उमटले. पाकिस्तानचा तर अक्षरशः जळफळाटच झाला. अंतराळाचे शस्त्रास्त्रीकरण होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे बळकट करण्याची गरज आहे, असे नमूद करीत पाकिस्तानने हिंदुस्थानचा निषेध करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. अंतराळातील शस्त्रास्त्र स्पर्धा रोखण्यासाठी पाकिस्तान आग्रही आहे, असे पाकिस्तानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
अवघ्या तीन मिनिटांत पाडले ‘सॅटेलाइट’
‘मिशन शक्ती’च्या यशाने हिंदुस्थानने अंतराळातही युद्धाची क्षमता सिद्ध केली असून कोणतेही संशयास्पद ‘सॅटेलाइट’ पाडून टाकण्याचे सामर्थ्य प्राप्त केले आहे. देशाच्या शास्त्रज्ञांनी बुधवारी‘मिशन शक्ती’ अभियानात अंतराळातील लो अर्थ ऑर्बिटमध्ये 300 किलो मीटर दूरवरील एक सॅटेलाइट हल्ला करून अवघ्या तीन मिनिटांत पाडले. हिंदुस्थानातच बनवलेल्या ऍण्टी सॅटेलाइट मिसाईलचा वापर करून ही कामगिरी करण्यात आली. ‘मिशन शक्ती’ हे आमच्या भविष्यातील सुरक्षेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचा उपयोग 130 कोटी जनतेची सुरक्षा आणि शांततेसाठी आम्ही करणार आहोत. आमचा युद्धाचा हेतू नाही. जगात आम्हाला शांतता कायम राखायची आहे.
राहुल गांधींनी मोदींना दिल्या रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा
‘मिशन शक्ती’ अभियान यशस्वी झाल्यानंतर डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांचे कौतुक, अभिनंदन करतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देत त्यांची खिल्ली उडवली. मोदी हे उत्तम अभिनेते आहेत असेच त्यांनी त्यातून सूचित केले आहे.
शास्त्रज्ञांची कामगिरी अभिमानास्पद, उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाची थाप
हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांनी आपल्या देशाचे नाव जगामध्ये अत्यंत उंचावर नेऊन ठेवलेले आहे. देशाच्या या सुपुत्रांचा हिंदुस्थानच्या सर्व जनतेला अभिमान आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा गौरव केला.
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, देशाचे जवान, शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर असोत, प्रत्येक जण आपली कामगिरी चांगल्या रीतीने बजावत असतो. त्यांना सरकारने पाठबळ देण्याची आवश्यकता असते. देशाच्या या सुपुत्रांना सरकारनेही पाठबळ दिलेले आहे याचे समाधान आहे. यावेळी निवडणुकीचे टायमिंग साधत ही कामगिरी करण्यात आली का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी टायमिंगला टायमिंग नसते असे मिश्किल उत्तर देतानाच निवडणुका येत-जात असतात, पण देशाची प्रगती थांबता कामा नये. त्याला लोक कोणत्या नजरेने बघतात याचा विचार न करता प्रगती करीत राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही कामगिरी मी केलेली आहे असे न सांगता शास्त्रज्ञांनीच ही कामगिरी केली असल्याचे म्हटल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.




























































