सूर्याच्या तुफानात ‘किवीज’ गारद, सूर्यकुमारची 51 चेंडूंतच नाबाद 111 धावांची बरसात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माऊंट मोनेगाईच्या मैदानात आधी पाऊस बरसला आणि त्यानंतर सूर्या नावाचे वादळ भिरभिरले. यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजीची यथेच्छ धुलाई करीत सूर्यकुमार यादवने 51 चेंडूंत नाबाद 111 धावांची शतकी खेळी साकारली.

सूर्याच्या शतकी खेळीच्या बळावरच टीम इंडियाने दुसऱया टी-20 लढतीत 6 बाद 191 ही धावसंख्या उभारली आणि न्यूझीलंडला 65 धावांनी पराभूत करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सूर्याच्या तांडवानंतर ऑफस्पिनर दीपक हूड्डाने 10 धावांतच 4 फलंदाजांना बाद करीत न्यूझीलंडचा डाव 126 धावांतच गुंडाळला. हुड्डाला मोहम्मद सिराज 24 धावांत 2 तर युजवेंद्र चहल 26 धावांत 2 यांनी उत्तम साथ दिली. लढतीचा ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून सूर्यकुमारला गौरविण्यात आले.

सूर्याने ‘सिक्सर किंग’ युवराजला टाकले मागे

सूर्याने या लढतीत केवळ तुफानी नाबाद शतक झळकावले नाही तर त्याने एक विक्रमही रचला. सूर्याने यावेळी टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगचा विक्रमही मोडीत काढला आहे. आजच्या सामन्यात सूर्याने एकूण सात षटकार खेचले. या सात षटकारांसह त्याने युवीला मागे टाकले आहे. युवीने टी-20 क्रिकेटमध्ये 74 षटकार लगावले होते, पण आज सूर्याने सात षटकार लगावले आणि त्याच्या नावावर एकूण 79 षटकार झाले आहेत. सूर्यकुमारच्या शतकी खेळीत 11 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.