हिंदुस्थान विजयापासून सहा पावले दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थान व यजमान ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघांमधील पहिला कसोटी क्रिकेट सामना सध्या भलताच रोमहर्षक वळणार आलाय. कसोटीचा उद्या पाचवा व अखेरचा दिवस असून पाहुण्या ‘टीम इंडिया’ला विजयासाठी 6 बळी हवे आहेत, तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 219 धावांची गरज आहे. सध्या सामना दोलायमान अवस्थेत असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात उर्वरित 49 षटकांच्या खेळात 4 बाद 104 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शॉन मार्श 31, तर ट्रव्हिस हेड 11 धावांवर खेळत होते. सोमवारी हिंदुस्थानी गोलंदाज टिच्चून मारा करणार की ऑस्ट्रेलियन फलंदाज चिवट झुंज देणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील.

इशांतने बळी मिळवला, पण...
पहिल्या डावात 15 धावांची अल्पशी आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानने दुसऱ्या डावात 307 धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात नाट्यमय झाली. हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ऍरोन फिंचला भोपळाही फोडू न देता पायचीत केले. मात्र फलंदाजाने डीआरएसची मदत घेतली. त्यात इशांतचा तो चेंडू नो बॉल असल्याने पंचांना फिंचला बाद दिलेला निर्णय बदलावा लागला. ऍडलेड कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ काळ्या पट्टया बांधून मैदानावर उतरला. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज कॉलिन गेस्ट यांचे निधन. 81 कर्षीय गेस्ट यांनी शनिवारी (दि. 8) अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून केवळ 1 कसोटी सामना खेळला, पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 36 सामन्यांत 115 बळी टिपले. त्यांना श्रद्धांजली म्हणून सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ काळ्या पट्टया बांधून मैदानात उतरला.त्याआधी हिंदुस्थानने रविवारी सकाळी तिसऱ्या दिवसाच्या 3 बाद 151 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. चेतेश्वर  पुजाराने 204 चेंडूंच्या संयमी खेळीत 71 धावांची खेळी करताना 9 चौकार लगावले. अजिंक्य रहाणेने 147 चेंडूंत 7 चौकारांसह 70 धावा केल्या. रिषभ पंतने 16 चेंडूंत 4 सणसणीत चौकार व एका उत्तुंग षटकारासह 28 धावांची टी-20 स्टाइल खेळी केली. या तिघांमुळेच हिंदुस्थानला तीनशेचा टप्पा ओलांडता आला.

अश्विन, शमीचा डबल धमाका
ऍरोन फिंचला मिळालेल्या जीवदानाचा फारसा फायदा उठवता आला नाही. चहापानाच्या आधी रविचंद्रन अश्विनने फिंचला (11) यष्टीमागे रिषभ पंतकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पदार्पणवीर मार्कस् हॅरिसला मोहम्मद शमीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावणे महागात पडले व यष्टीमागे पंतने आठवा झेल टिपला. त्याआधीच हॅरिसला पुजाराने सोपा झेल सोडून जीवदान दिले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजा व शॉन मार्श या अनुभवी जोडीकडून आशा होत्या, मात्र अश्विनने ख्वाजाला (8) बाद करून हिंदुस्थानला मोठे यश मिळवून दिले. या डावखुऱ्या फलंदाजाने उसळत्या चेंडूला फटकावण्याचा प्रयत्न केला, पण रोहित शर्माने सुरेख झेल टिपून ख्वाजाला तंबूत धाडले. मग शॉन मार्शने आलेल्या पीटर हॅण्डस्कॉम्बच्या साथीने झुंज देताना पुढची 13 षटके हिंदुस्थानला यश मिळू दिले नाही. कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा मोहम्मद शमीला मोर्चावर आणले. शमीने आखूड टप्प्याच्या चेंडूवर हॅण्डस्कोम्बला चकविले आणि मिडविकेटला पुजाराने सोपा झेल पकडल्याने कागांरूंची 36.5 षटकांत 4 बाद 84 अशी दुर्दशा झाली. त्यानंतर शॉन मार्श व ट्रव्हिस हेड यांनी हिंदुस्थानला आणखी बळी मिळू दिला नाही.