INDW vs AUSW Test Match – पहिल्याच दिवशी कसोटीवर पकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्याच आठवडय़ात इंग्लंडवर सहज मात करणाऱया हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धही जोरदार खेळ दाखवत एकमेव कसोटीच्या पहिल्याच दिवशी आपली पकड मजबूत केली. पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानने पहिल्या दिवसअखेर 1 बाद 98 अशी दमदार मजल मारत पहिला दिवस आपल्या नावावर केला. आता हिंदुस्थान केवळ 121 धावांनी पिछाडीवर असल्यामुळे दुसऱया दिवशी मोठी आघाडी घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण तो अपयशी ठरला. पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फोबी लिचफिल्ड धावबाद झाली आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाला नजर लागली. फोबी एकही चेंडू न खेळताच बाद झाली आणि पूजा वस्त्रकारने आपल्या चौथ्याच चेंडूवर एलिस पेरीचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियन डावाला दुसरा हादरा दिला. फलकावर केवळ 7 धावा लागल्या होत्या. बेथ मूनी आणि ताहिला मॅकग्राने ऑस्ट्रेलियाचा पडझड रोखण्यात यश मिळवत तिसऱया विकेटसाठी 80 धावांची भागी रचली. ताहिलाने 56 चेंडूंत 50 धावांची खणखणीत खेळी करून ऑस्ट्रेलियन डावात जान आणली, पण स्नेह राणाने तिचा अडसर दूर केल्यानंतर ऑस्ट्रेलियन डावाला कुणीही सावरू शकला नाही.