हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाला हवाय पृथ्वी शॉ, शुभमन गीलला दुखापत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामी फलंदाज शुभमन गीलला दुखापत झाली असून आता तो सहा ते आठ आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडसारख्या खडतर दौऱयात हिंदुस्थानला सलामीवीराची गरज भासणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉसाठी संघाचे दरवाजे उघडे केले आहेत. बीसीसीआयने पृथ्वी शॉला हिंदुस्थानी संघात खेळता यावे यासाठी इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे तशी विनंतीही केली आहे. अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे.

सध्या श्रीलंकन दौऱयावर

हिंदुस्थानचे दोन संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचा संघ श्रीलंकेत वन डे व टी-20 मालिकेत झुंजणार आहे. सध्या पृथ्वी शॉची श्रीलंकन दौऱयावर असलेल्या हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे. पृथ्वी शॉला कसोटी मालिकेसाठी बोलावणे आल्यास त्याला तेथून इंग्लंडमध्ये रवाना व्हावे लागणार आहे.

मयांक अपयशी तर इस्वरनकडे अनुभवाची कमी

शुभमन गीलला दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाकडे त्याच्या अनुपस्थितीत सलामी फलंदाजांसाठी लोकेश राहुल, मयांक अग्रवाल व अभिमन्यू इस्वरन हे तीन पर्याय आहेत. मयांक अग्रवालला गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. अभिमन्यू इस्वरन याने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टीम इंडियाचे व्यवस्थापन इंग्लंडसारख्या प्रदीर्घ दौऱयात अभिमन्यू इस्वरन या युवा खेळाडूच्या खांद्यावर सलामी फलंदाजाची जबाबदारी सोपवतील असे वाटत नाही. लोकेश राहुल याला सलामीला फलंदाजी करताना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. अंतिम संघात स्थान दिल्यास लोकेश राहुलला सलामीऐवजी मधल्या फळीत खेळवण्यात येईल. त्यामुळे सलामी फलंदाजासाठी फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉला टीम इंडियाकडून पाठिंबा मिळत आहे.

धावांचा पाऊस

पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीत अपयशाचा सामना करावा लागला. पण या कसोटीत हिंदुस्थानचे सर्वच खेळाडू फ्लॉप ठरले होते. मात्र पृथ्वी शॉला संघाबाहेर काढण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने विजय हजारे तसेच आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला. मुंबईकर फलंदाजाच्या याच कामगिरीचे काैतुक चोहोबाजूंनी करण्यात आले. त्यामुळे आता हिंदुस्थानच्या प्रमुख संघासाठीही त्याला बोलावण्यात येत आहे.