
टेन्शन, खुन्नस, थरार म्हणजे काय असते हे रविवारी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीत ‘याचि देही याचि डोळा’ बघायला मिळाले. अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या सुपर-12 लढतीत अखेर टीम इंडियाने चार गडी राखून बाजी मारली अन् कोटय़वधी हिंदुस्थानी चाहत्यांनी हुश्श? करत सुटकेचा निःश्वास सोडला. मग हिंदुस्थानी चाहत्यांनी मेलबर्नचे मैदान डोक्यावर घेतले, तर इकडे हिंदुस्थानात लक्ष्मीपूजनापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी केली.
दुसरीकडे हातातील सामना अखेरच्या क्षणी निसटल्याने पाकिस्तानी समर्थकांनी आपल्याच खेळाडूंना शिव्यांची लाखोली वाहत मैदान सोडले. अर्शदीप सिंगची भन्नाट गोलंदाजी, हार्दिक पांडय़ाची अष्टपैलू कामगिरी आणि विराट कोहलीने अखेरपर्यंत लढवलेला किल्ला ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. ‘सामनावीर’ ठरलेल्या विराटच्या 53 चेंडूंतील नाबाद 82 धावांच्या खेळीला 6 चौकार व 4 षटकारांचा साज होता.
राहुल-रोहितचा फ्लॉप शो
पाकिस्तानकडून मिळालेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. लोकेश राहुलने (4) नसीम शाहच्या गोलंदाजीवर चेंडू यष्टय़ांवर ओढून आत्महत्या केली. हारिश रऊफच्या गोलंदाजीवर इफ्तिखारने रोहितचा स्लीपमध्ये सुरेख झेल टिपत पाकिस्तानला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर रऊफने सूर्यकुमार यादवला (15) यष्टीमागे रिझवानकरवी झेलबाद केले, तर बढती मिळालेला अक्षर पटेल (2) दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्याने हिंदुस्थानची 6.1 षटकांत 4 बाद 31 अशी दुर्दशा झाली.
View this post on Instagram
विराट-हार्दिकची शतकी भागीदारी
हिंदुस्थानचा डाव संकटात सापडलेला असताना वन डाऊनला आलेला विराट कोहली व पाचव्या क्रमांकावर आलेला हार्दिक पांडय़ा यांनी जबाबदारीने खेळ करीत पाकिस्तानी गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 113 धावांची बहुमोल भागीदारी करून हिंदुस्थानला संकटातून बाहेर काढले. या जोडीने शाहिन शाह आफ्रिदीच्या 18 व्या षटकांत 17, तर हारिस रौफच्या 19 व्या षटकांत 15 धावांची लयलूट केली. हिंदुस्थानला अखेरच्या 6 चेंडूंत विजयासाठी 16 धावांची गरज होती. मोहम्मद नवाझने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला बाबरकरवी झेलबाद करून सामन्यातील रंगत वाढवली. कोहलीने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला अन् तो चेंडू नो बॉलही ठरल्याने हिंदुस्थानचा दुहेरी फायदा झाला. दिनेश कार्तिक (1) पाचव्या चेंडूवर बाद झाल्याने सामना दोलायमान हिंदोळय़ावर झुलत होता. अश्विन फलंदाजीला आला. अखेरचा चेंडू वाईड गेला अन् सामना बरोबरीत आला. मग अश्विनने एक धाव घेत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट कोहलीची नाबाद 82 धावांची खेळी अखेर निर्णायक ठरली.




























































