
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी सैन्याने आपल्या पदांमध्ये मोठा बदल करण्याचं निश्चित केलं असून त्याअंतर्गत ब्रिगेडियर हे पद हटवण्यात येण्याची शक्यता आहे. ३५ वर्षांनंतर हा बदल करण्यात येणार असून रँकिंगमध्ये कपात करण्यात येणार आहे. या कपातीचा उद्देश सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि सैन्यभरतीला सनदी सेवांच्या पातळीवर आणणे हा आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सनदी सेवांमध्ये सहा अधिकारी पदे आहेत, पण सैन्यात मात्र अजूनही ९ पदे आहेत. या बदलानंतर ही संख्या ६ किंवा ७ करण्यात येणार आहे. यासाठी सैन्याचे प्रमुख बिपिन रावत यांनी या बदलासाठी गेल्या महिन्यात एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती नोव्हेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर नेमके कोणते बदल करायचे आणि ब्रिगेडियर हे पद हटवायचं किंवा नाही, हा निर्णय घेण्यात येईल. जर हे पद हटवण्यात आलं, तर कर्नल पदावरील अधिकाऱ्याला बढतीमध्ये थेट मेजर जनरल हे पद मिळू शकतं.
या बदलांनंतर सनदी सेवा अधिकारी आणि सैन्य अधिकारी यांच्या ग्रेड्स आणि पगारांमध्ये असलेली तफावत कमी होण्याची शक्यता आहे. सध्या हिंदुस्तानी सैन्यात १२ लाख सैनिक असून त्यात अधिकाऱ्यांची संख्या ४२ हजार आहे.

























































