नागरिकांवरील गोळीबार थांबवा; लष्कराची पाकड्यांना सक्त ताकीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्व बाजूंनी कोंडीत अडकलेल्या पाकड्यांकडून सीमाभागात अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात येत असून सीमाभागातील नागरी वस्तीला ते लक्ष्य करत आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाची गंभीर दखल घेत हिंदुस्थानी लष्कराने नागरिकांवरील गोळीबार थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी सक्त ताकीद पाकड्यांना दिली आहे. लष्कराला डिवचल्यास चांगलाच धडा शिकवू.गोळीबार थांबवला नाही तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही लष्कराने स्पष्ट केले.

गेल्या 24 तासात पाकड्यांनी कृष्णा घाटी आणि सुंदरबनी सीमाभागातील नागरिकांवर गोळीबार करत आहे. या गोळीबारात जिवीतहानी झालेली नाही. मात्र, पाकिस्तानने हिंदुस्थानच्या नागरी वस्त्यांवर केलेल्या गोळीबाराची गंभीर दखल घेत लष्कराने पाकड्यांना सज्जड दम दिला आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांची कोणतीही आगळीक खपवून घेणार नाही, असेही लष्कराने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकड्यांकडून सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन सुरू असून आता त्यांनी नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नागरी भागात मोठ्या प्रमाणात मोर्टार डागून सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्यामुळे लष्कराने पाकड्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावर जगभरात एकाकी पडलेला पाकिस्तान विनाकारण सीमा भागातील नागरिकांना लक्ष्य करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, यापुढेही अशीच आगळीक सुरू ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा लष्कराने पाकिस्तानला दिला आहे.