आयओएच्या हटवादीपणामुळे हिंदुस्थानी फुटबॉल संघांच्या आशांवर पाणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ दांडेकर । मुंबई

हिंदुस्थानी फुटबॉल संघाला जकार्ता एशियाडमध्ये जाऊच द्यायचे नाही असा चंगच हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) बांधला आहे. आयओएच्या या हटवादी भूमिकेमुळे इंडोनेशियातील यंदाच्या आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या हिंदुस्थानी फुटबॉलपटूच्या आशांवर पार पाणी फेरले गेले आहे. फुटबॉलला पात्रतेचा कडक निकष लावणाऱ्या आयओए ने आपल्याच निकषात ढिलाई देत पदकाची अपेक्षा नसलेल्या सेपक टकराव आणि महिला हँडबॉल संघांवर मात्र कृपादृष्टी दाखवली आहे. आयओएच्या कारभारात एकाधिकारशाही दाखवणारे अध्यक्ष नरिंदर बात्रा, एशियाड तयारी प्रमुख ललित भानोत आणि सचिव राजीव मेहता यांचा फुटबॉलवर एवढा राग का? असा सवाल देशातील फुटबॉलप्रेमी करीत आहेत.

२०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी फुटबॉल संघ प्राथमिक फेरीतच बाद झाला होता हे एकच निमित्त करून बात्रा आणि कंपनीने हिंदुस्थानच्या एशियाड फुटबॉल सहभागाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानी फुटबॉल संघाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे याची साधी दखलही आयओएला घ्यावीशी वाटली नाही.ऑलिम्पिक संघटनेच्या ४१ सदस्यीय जंबो निवडसमितीत फुटबॉल महासंघाच्या एकही सदस्याला स्थान नाहीय. समितीत लॉन बॉल आणि कराटे या देशाला पदक मिळवून न देणाऱ्या खेळांचे प्रतिनिधी आहेत याबद्दल देशातील फुटबॉलशौकिनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गेल्या आशियाई स्पर्धेत महिला हँडबॉल संघ शेवटून दुसरा म्हणजे नववा तर महिला व्हॉलीबॉल संघ आठव्या स्थानावर राहिला होता. सेपक टकराव संघ तर पुरुष आणि महिला गटात प्रारंभीक फेरीतच सर्वात शेवटी राहिला होता. या दारुण अपयशानंतरही या तीन खेळांचे संघ ५२४ सदस्यीय जंबो हिंदुस्थानी चमुतून जकार्ताला जाणार आहेत.हा सर्व प्रकारच संतापजनक असल्याची संतप्त प्रतिक्रिया अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

हा तर हिंदुस्थानी फुटबॉलचा अपमान -हेनरी मेनेझीस
आयओए अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर करताना आपल्या फुटबॉल संघाचा ”अल्सो रॅन्स” (फक्त टाईमपास ) असा उपहासात्मक उल्लेख करून हिंदुस्थानी फुटबॉलचाच नव्हे तर देशातील कोट्यवधी फुटबॉलशौकिनांचा अपमान केलाय. बात्रा यांना एकतर खेळांविषयी फार माहिती नसावी किंवा फुटबॉलवर त्यांचा राग असावा. त्यांच्यासारख्या जबाबदार क्रीडा प्रशासकाला असे वक्तव्य मुळीच शोभत नाही. हिंदुस्थानी फुटबॉल संघ गेली काही वर्षे अफलातून कामगिरी करतोय हे बात्रा यांना कुणीतरी समजवायला हवे. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशातील फुटबॉलशौकिनांची जाहीर माफी मागावी, अशी संतप्त मागणी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) सिइओ हेनरी मेनेझीस यांनी दैनिक सामनाशी बोलताना व्यक्त केली.