
आसावरी जोशी ,[email protected]
येत्या मंगळवारी ‘हिंदुस्थानी लष्कर दिवस’ आहे. पाहूया आपल्या जवानांच्या, लष्कराच्या रंजक, प्रबोधनात्मक, शौर्यपूर्ण आणि माहीत नसलेल्या गोष्टी…
येत्या 15 जानेवारीला हिंदुस्थानी लष्कर दिन आहे. हिंदुस्थानी लष्कर आपली शान… अभिमान… सुरक्षितता… लष्कराचा भूदल विभाग हा हिंदुस्थानी सशस्त्र सेनेचा खूप मोठा भाग आहे. लहानपणापासून लष्करी वातावरण खूप जवळून पाहिले… अनुभवले… लष्करी अधिकाऱयांची शिस्त, त्यांचा रुबाब, जाज्ज्वल्य देशप्रेम, पहाटे पाच वाजताच सुरू होणारी शिस्तबद्ध परेड. त्यांचा परिटघडीचा गणवेश… याचबरोबर सतत फिरतीची नोकरी. घरापासून महिनोन् महिने दूर… या लष्करी अधिकाऱयांचा आपापसातील एकोपा, सुख-दुःखाच्या प्रसंगी एकत्र येणं, होळी, दिवाळी, दसरा हे सण एकत्र येऊन उत्साहात साजरे करणं… त्यांच्या बायकांच्या लेडीज मीटस्… काय आणि किती गोष्टी… विस्तीर्ण पसरलेला लष्करी परिसर… त्यात त्यांची टुमदार घरं… व्यायामासाठी, परेड करण्यासाठी मोकळे मैदान… सरावासाठी होणारा दारूगोळय़ांचा आवाज… सगळेच शिस्तबद्ध. सतत शिस्तीची, देशभक्तीची, देशाप्रति कर्तव्याची जाणीव सतर्क ठेवणारं… मला या लष्करी वातावरणात नेहमीच खूप सुरक्षित वाटतं…
युद्धस्य कथा रम्या… असे नेहमीच म्हटले जाते. ते जरी खरे असले तरी लष्कराच्या आणि सैन्याशी संबंधित गोष्टी खरोखरच प्रबोधन करणाऱया, मनोरंजक आणि मनात देशप्रेमाची जाणीव सतत जागती ठेवणाऱया.
राष्ट्रीय सुरक्षा व ऐक्य
अबाधित ठेवणे, परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही लष्कराची प्रमुख कर्तव्ये आहेत. हिंदुस्थानी लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळीसुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते.
सियाचीन. जगातील सर्वाधिक उंचीचे युद्ध क्षेत्र. आपल्या सैन्याला विशेष प्रशिक्षण देऊन येथे तैनात केले जाते. लान्सनायक हनमंत अप्पासारख्या अनेक वीरांनी येथे आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. येथे जवानांना उच्च रक्तदाबाबरोबरच विस्मरणाचा विकार होण्याची शक्यता असते.
लष्करात एकूण 11 रेजिमेंटस् आहेत
1) आसाम रेजिमेंट
2) कुमाऊ रेजिमेंट
3) गुरखा रेजिमेंट
4) जाट रेजिमेंट
5) डोग्रा रेजिमेंट
6) पंजाब रेजिमेंट
7) बिहार रेजिमेंट
8) मराठा रेजिमेंट
9) राजपूत रेजिमेंट
10)महार रेजिमेंट
11) शीख रेजिमेंट
आपले लष्कर जगातील तिसऱया क्रमांकाचे बलाढय़ लष्कर आहे. अभ्यास व सराव करून लष्कर स्वतःला सक्षम बनवत आहे.आपल्या संविधानात अशी तरतूद आहे की गरज पडल्यास प्रत्येक नागरिकाची सैन्यात भरती केली जावी. लष्कराच्या कामाची विभागणी लढाऊ आणि सेवा अशा दोन विभागांत होते. लढाऊ विभागातही दोन प्रकार पडतात. पहिला पायदळ याला इन्फण्ट्री म्हणून ओळखले जाते. हा विभाग म्हणजे प्रत्यक्ष सीमेवर लढणारा. दुसरा विभाग म्हणजे सहाय्यक सैन्य विभाग. लढणाऱया सैन्याला आवश्यक त्या सेवा, सुविधा पुरविणारा विभाग.
15 जानेवारी 1949 रोजी जनरल करिअप्पा यांनी हिंदुस्थानचे पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. या ऐतिहासिक क्षणानिमित्त हा दिवस सैन्यदल दिवस म्हणून साजरा केला जातो.
हिंदुस्थानचे राष्ट्रपती हे हिंदुस्थानी लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख संपूर्ण सेनेचे नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षाही वरचढ आहे. आतापर्यंत ती फक्त दोनच हिंदुस्थानी अधिकाऱयांना मिळाली आहे.
हॅण्डग्रेनेड
बनवण्यासाठी आपले सैन्य भूत झोलकीया मिरचीचा उपयोग करते. त्यामुळे यात उत्पादक शेतकऱयांचा फायदा होतो.
कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगील युद्धाच्या वेळी पेप्सीच्या ‘दिल मांगे मोअर’ या ओळीला युद्धनारा म्हणून घोषित केले. त्यामुळे ही घोषणा अधिकच प्रसिद्ध पावली.
आपल्या लष्कराचा सोल्जर कट खूप लोकप्रिय आहे. समानतेची भावना, स्वच्छता या कारणांमुळे हा सोल्जर कट करावा लागतो.
एनडीएच्या कॅडेटस् मेसमध्ये एक मेज नेहमी सजवून ठेवलेले असते. हे रिकामे मेज आणि खुर्ची Missing in Action किंवा Prisoners of war जवानांच्या स्मरणार्थ ठेवली जाते.
पुण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमी अर्थात NDA मध्ये केवळ हिंदुस्थानीच नव्हे तर विविध 28 देशांमधील कॅडेटस् प्रशिक्षणासाठी येतात.
गोरखा रेजिमेंटमध्ये सहभागी होणाऱया अधिकाऱयांसाठी गोरखा लोकांची भाषा शिकून घेणे बंधनकारक आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशाँ म्हणाले होते की, जर कोणी व्यक्ती असे म्हणत असेल की त्याला मृत्यूचे भय नाही, तर एक तर तो खोटे बोलतोय नाही तर तो गोरखा आहे.
हिंदुस्थानी सेना…Service Before Self
अर्थ…स्वतःआधी देशसेवा.
सैन्य हवाई संरक्षण…आकाशे शत्रून जहि
अर्थ…आकाशातच शत्रूला मारून टाका.
हिंदुस्थानी हवाई दल…नभस्पर्श दीप्तम्
अर्थ…आकाशाला स्पर्श करा.
हिंदुस्थानी नौदल…शन्नो वरुणः
अर्थ… समुद्र देवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहावा.
तोफखाना विभाग…सर्वत्र इज्जत-ओ-इकबाल
अर्थ…सर्वत्र गर्व आणि आदर
रक्षक ब्रिगेड…पहला हमेशा पहला
अर्थ…स्थिती कशीही असली तर आम्ही सर्वात पहिले तैनात राहू.
मद्रास रेजिमेंट…स्वधर्मे निधनं श्रेयः
अर्थ…सेवा करताना जीव गमावणे अभिमानाची गोष्ट आहे.
गोरखा रेजिमेंट…कायर हुनु भन्दा मर्नु रामो
अर्थ…भेकडाप्रमाणे जगण्यापेक्षा शौर्याने मरणे चांगले
राजपुताना रायफल्स…वीर भोग्य वसुंधरा
अर्थ…जो वीर आहे तोच या धरतीवर राज्य करील
शीख रेजिमेंट…निश्चै कर अपी जीत करों
अर्थ…दृढ संकल्पाने मी जिंकणार
डोगरा रेजिमेंट…कर्तव्यम अन्वात्मा
अर्थ…मरण्याआधी कर्तव्य
जम्मू आणि कश्मीर लाइट इन्फण्ट्री
बलिदानम वीर लक्ष्मणम
अर्थ…त्याग हे वीरांचे लक्षण आहे.
आपल्या लष्करात वाहन म्हणून नेहमी मारुती जिप्सी वापरली जाते. खडकाळ, रस्ता नसलेल्या भागात तिची धावण्याची क्षमता हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. वजनाला हलकी असल्यामुळे जिप्सी कुठेही पोहोचते. शिवाय भरपूर शक्ती आणि क्षमता.
लष्करी गणवेश अरण्य आणि झाडाझुडपांत वावरण्यासाठी खास तयार केलेला आहे. या गणवेशाशी अनेक भावना जोडल्या जातात. शिस्त, उत्साह आणि बलिदान या गणवेशाशी जोडले गेले आहे. हा गणवेश अग्निरोधक असतो. त्यामध्ये झीप न वापरता बटणांचाच वापर केला जातो.





















































