
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
रेल्वेच्या एसी कोचमधील कुबट वासाची मळकट ब्लँकेट्स आता गायब होणार आहेत. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एसी कोचमधील ब्लँकेट्सची महिन्यातून दोनदा धुलाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज प्रवासादरम्यान वापरण्यात येणारी ब्लँकेट्स यापूर्वी दोन महिन्यांतून फक्त एकदा धुतली जात होती.
हिंदुस्थानभर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडय़ांमध्ये एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन ब्लँकेट्सही पुरविण्यात येणार आहेत. ही ब्लँकेट्स लोकर आणि नायलॉनपासून बनवलेली असून या ब्लँकेट्ससाठी जादा पैसे रेल्वेला मोजावे लागणार आहेत. सध्या वापरण्यात येणाऱ्या लोकरीच्या ब्लँकेट्सची किंमत ४०० रुपये आहे. नव्या ब्लँकेट्सची किंमत रेल्वेने अद्याप ठरवलेली नाही.
जास्त धुण्याने ब्लँकेट्स लवकर खराब होण्याचा धोका
कोणतेही कापड जास्त धुतल्याने लवकर खराब होते. नवी ब्लँकेट्स महिन्यातून दोनदा धुतल्याने त्यांचा वापर चारऐवजी दोनच वर्षे करता येणार आहे. तसेच नव्या ब्लँकेट्सची किंमतही आधीपेक्षा दुप्पट असण्याची शक्यता आहे. मळकट, दुर्गंधीयुक्त ब्लँकेट्सविषयी प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
ब्लँकेट्सच्या उपलब्धतेवर धुलाई ठरविणार
महिन्यातून दोनदा ब्लँकेट्सची धुलाई हा निर्णय ब्लँकेट्सची उपलब्धता व दळणवळणाची सोय याद्वारे ठरविण्यात येणार आहे. ब्लँकेटचा तुटवडा जाणवत असेल तर धुलाई महिन्यातून एकदा होईल, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच रेल्वे प्रत्येक राज्यातील प्रमुख स्थानकांमध्ये लॉन्ड्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे जेणेकरून प्रवाशांना स्वच्छ ब्लँकेट्स उपलब्ध होतील.
रेल्वेच्या एसी कोचने प्रवास करणाऱ्या देशभरातील प्रवाशांसाठी रेल्वेला दिवसाला ३.९० लाख ब्लँकेट्स लागतात.
यापैकी फक्त एसी प्रथम वर्गात वापरण्यात येणारी ब्लँकेट्स एकदा वापरल्यानंतर बदलण्यात येतात.
मात्र ही सुविधा एसी टू आणि थ्री टायर कोचसाठी नाही.
सध्या एसी कोचमध्ये प्रवाशांना ब्लँकेट्स, दोन बेडशीट, टॉवेल आणि उशी दिली जाते.
रेल्वेशी संबंधित ५० लॉन्ड्रीज कार्यरत असून महिन्यातून दोनदा ब्लँकेट्स धुण्यासाठी आणखी १० लॉन्ड्री रेल्वेला सुरू कराव्या लागणार आहेत.



























































