हेरगिरीसाठी येत्या पाच वर्षांत हिंदुस्थानचे 50 उपग्रहांचे जाळे; इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमेलगतच्या प्रदेशातील सैन्य हालचाली आणि इतर घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी येत्या पाच वर्षांत 50 उपग्रह प्रक्षेपित करण्याची हिंदुस्थानची योजना असल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गुरुवारी येथे सांगितले.

मुंबई आयआयटीतील वार्षिक टेकफेस्ट महोत्सवात त्यांनी ही माहिती दिली. पृथ्वीभोवती विविध भ्रमण कक्षांतून फिरणाऱ्या या हेरगिरीपर उपग्रहांची साखळी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्याबरोबरच हजारो किमी भूभागाचे छायांकन करू शकेल, असे ते म्हणाले.

उपग्रहांची निरीक्षण, विश्लेषण क्षमता वाढवण्याचे आव्हान
नजरेखालील भूभागावर दिसणारे बदल ओळखून संबंधित माहितीचे विश्लेषण करून फक्त आवश्यक ती माहितीच नियंत्रण केंद्राकडे पाठवण्याची उपग्रहांची क्षमता वाढवण्यावर यापुढे सर्वाधिक भर दिला पाहिजे. ही क्षमता वाढवणे महत्त्वाचे आव्हान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाच्या सीमा आणि लगतच्या प्रदेशांवर नजर ठेवण्याची उपग्रहांची क्षमता असते. अशी क्षमता असणारे उपग्रह आपल्याला प्रचंड ताकद देऊ शकतात. याचसाठी येत्या पाच वर्षांत 50 उपग्रह सोडण्याची जुळणी आपण केली आहे. या उपग्रहांचे जाळे तीन कक्षांत विभागण्याचा मार्गही आम्ही शोधला आहे, असे त्यांनी सांगितले.