मला लाभलेले चाहत्यांचे प्रेम हजार ऑलिम्पिक सुवर्णापेक्षा मौल्यवान, विनेश कुस्तीपासून दूर राहणार नसल्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुस्तीपटू विनेश फोगाटचे ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजनवाढीमुळे पदक हुकले. त्यामुळे ती खचली आणि तिने कुस्तीमधून निवृत्तीही पत्करली, पण हिंदुस्थानात झालेल्या अभूतपूर्व स्वागतामुळे ती पुन्हा प्रफुल्लित झाली आहे. तिने पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरण्याचे संकेतही दिलेत. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या हजार सुवर्ण पदकांपेक्षाही मला हिंदुस्थानात लाभलेले चाहत्यांचे-हिंतचिंतकांचे प्रेम मौल्यवान असल्याची जबरदस्त प्रतिक्रिया विनेश फोगाटने देत आपले दुःख मागे पडल्याची भावना अप्रत्यक्षपणे व्यक्त केलीय.

पॅरिसहून मायदेशी परतल्यानंतर विनेशचा अद्भुत रोड शो तब्बल 13 तास चालला. यादरम्यान लाखो चाहत्यांनी शेकडो ठिकाणी तिचे स्वागत केले, कौतुक केले आणि प्रेमाचा वर्षाव केला. हिंदुस्थानी क्रीडा इतिहासात असे अभूतपूर्व स्वागत कोणाचेही झालेले नाही. ते प्रेम विनेशला मिळाले. लोकांचे प्रेम आणि स्वागत स्वीकारून-स्वीकारून विनेश अक्षरशः थकली. तिने आपल्याबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल अवघ्या देशाचे मनापासून आभार मानले. विनेशच्या यात्रेला संघर्ष आणि क्रांतीचे रूप प्राप्त झाले होते आणि तिला पाठिंबा देण्यासाठी उसळलेला जनसागरही त्याच घोषणा देत होता.

म्हारी छोरी, खरा सोना असे फलकही लक्ष वेधत होते. या साऱ्या वातावरणामुळे विनेश फार काळ कुस्तीपासून दूर राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ती पुन्हा नव्या जोमाने कुस्तीतील दिग्गजांची मस्ती उतरवण्यासाठी मैदानात उतरेल, अशी साऱ्यांचीच भावना झाली आहे. विनेशला साथ देणाऱ्या साक्षी मलिकनेही पदक नाही मिळाले म्हणून काय झाले, ती आमची खरी चॅम्पियन आहे. ती खूप दिवसांनी हिंदुस्थानात परतलीय. ती खूप भावनिक आहे. काही दिवस आपल्या कुटुंबीयांबरोबर राहील आणि स्वतःला शांत करील. विनेशने महिलांसाठी जे काही केलेय ते कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया साक्षीने दिली