मास्क न घालणाऱ्यांची थेट कारागृहात रवानगी करा, इंदूर जिल्हाधिकाऱ्यांची पोलिसांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात करोनाच्या वर्षपूर्तीलाच रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आपल्या कामात व्यस्त असून अनेक कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. मास्क न घालणाऱ्यांची थेट कारागृहात रवानगी करण्याची सूचना इंदूरचे जिल्हाधिकारी मनिष सिंह यांनी पोलिसांना केली. या बैठकीत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देशात दिवसभरात विक्रमी 39 हजार 726 नव्या रुग्णांची वाढ झाली असून केवळ वीस हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे सध्या दोन लाख 71 हजार दोनशे 47 रुग्णांवर उपचार सुरू असून कोरोनाने एक लाख 59 हजार 405 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की गेल्या 24 तासात आढळलेले नवीन रुग्ण गेल्या वर्षी 1 डिसेंबर नंतर सर्वाधिक आहेत गुरुवारी बळींचा आकडा 152 झाला तर महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. येथे गुरुवारी पंचवीस हजार 833 नवीन संक्रमित आढळले असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 6968 रुग्ण अधिक वाढले.

यासोबतच देशातील एकूण रुग्ण संख्या 1 कोटी 15 लाख 14 हजार पार गेली आहे. गेल्या चोवीस तासात 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे गुजरातच्या अहमदाबादेत सरकारी बस स्थगित कराव्या लागल्या आहेत. मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी दोन तासांनी वाढवली आहे. तेथे रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असेल. पंजाबच्या नऊ शहरात रात्रीचा कर्फ्यू सुरू झाला आहे. या शहरात दररोज 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. दरम्यान कर्नाटकच्या मणिपाल एम आय टी कॅम्पस मध्ये 59 रुग्ण आढळल्यानंतर ते कंटेनमेंट झोन घोषित केले आहे

संसर्ग वाढण्यामागे राज्यातील माती हवामानाचा काहीही संबंध नाही – आय सी एम आर

आय सी एम आर चे वैज्ञानिक डॉक्टर समीरण पांडा यांच्यानुसार राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचे कारण येथील माती वा हवामान हे नाही. कमी कोरोना चाचण्या, फिजिकल डिस्टंसिंग न पाळणे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात गर्दी ही रुग्ण वाढीची कारणे आहेत. व्यावसायिक घडामोडी जास्त असलेल्या राज्यात लोकांचे बाहेर पडणे हे ही संसर्ग वाढण्यामागील महत्त्वाचे कारण आहे.

केंद्रीय पथक लस प्रकल्पांच्या उत्पादन वाढीचा आढावा घेणार

देशात दररोज सरासरी वीस लाख कोरोना लसीचे डोस देणे सुरू आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. यामुळे उत्पादन वाढत नाही तोपर्यंत सर्वांना लस देणे कठीण आहे. असे केंद्राचे मत आहे यामुळे कॅबिनेट सचिव यांच्या आदेशानुसार, अनेक मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांचे पथक स्थापण करण्यात आले आहे. त्यांना लस निर्मिती प्रकल्पात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या कंपन्यांशी चर्चा करून देशात कशाप्रकारे लस उत्पादनाची क्षमता वाढवली जाऊ शकेल यावर काम करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन कंपनीशी एकूण 18.5 कोटी डोसचा करार केला आ. यात सात कोटींवर डोस राज्यांना पाठवण्यात आले आहेत. भारत बायोटेकची लस उत्पादन क्षमता दरमहा चार कोटी आहे. सीरमची क्षमता दरमहा सहा ते सात कोटी आहे. मात्र अद्याप पूर्ण क्षमतेने उत्पादन होत नाही. मार्चमध्ये दोन्ही कंपन्यांचे सुमारे सात कोटी डोसचे उत्पादन सुरू होईल.