
मध्य प्रदेशमधील इंदूर येथे लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष बनलेली महिला आता लग्न करणार आहे. विशेष म्हणजे बहिणीच्या एका मैत्रिणीशी ती सात फेरे घेणार आहे. याआधी दोघांनी कोर्ट मॅरेजही केले होते. मात्र आता हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे दोघे लग्नबंधणात अडकणार आहेत.
लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष बनलेल्या महिलेचे नाव अस्तित्व आहे. त्याआधी तिचे नाव अलका असे होते. परंत 47व्या वाढदिवशी अलकाने लिंगबदल शस्त्रक्रिया केली आणि ती पुरुष बनली. आता अस्तित्वचे लग्न होणार असून आस्था असे होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. आस्था ही अस्तित्वच्या बहिणीची मैत्रिण आहे.
इंदूरच्या सुदामा नगरमध्ये राहणाऱ्या अलका सोनीला सुरुवातीपासून मुलांसारखे रहायला आवडत होते. लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपण महिलेची पुरुष होऊ शकते हे तिला कळाले. अखेर 47व्या वाढदिवशी तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली आणि नावही बदलले. याच दरम्यान अस्तित्वच्या बहिणीची आस्था नावाची मैत्रिण घरी आली. दोघांची ओळख झाली आणि सुरुवातीला मैत्री अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

चार-पाच महिने प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबियांना आपल्या निर्णयाबाबत कळवले. कुटुंबियांनी आनंदाने त्यांना होकार दिला. त्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केले.
लग्नाआधी दोघांनी अपर जिल्हाधिकारी रोशन राय यांना एक आवेदन लिहून स्वत:बाबत माहितीही दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवेदन स्वीकारले. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी अस्तित्व आणि आस्थान यांनी दोन्ही बाजुच्या दोन-दोन साक्षिदारांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर एक छोटेखानी रिसेप्शनही ठेवले. आता त्यांनी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत ‘एक दुजे के’ होण्याचा निर्णय घेतला असून 11 डिसेंबर रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.



























































