आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडे काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दादरमध्ये इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी ११६ झाडे काढावी लागणार आहेत. ही झाडे काढण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीने एकमताने मंजुरी दिली. यापैकी ७९ झाडे कापावी लागणार आहेत तर ३७ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. त्यामुळे आता डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम मार्गी लागू शकणार आहे.

वीर सावरकर मार्गावरील युनायटेड मिल नं ६ अर्थात इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक राज्य सरकारतर्फे उभारले जाणार आहे. या जागेवर मोठय़ा प्रमाणावर झाडे आहेत. स्मारकाच्या कामासाठी ही झाडे हटवावी लागणार आहेत. एमएमआरडीएने ही झाडे काढण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली होती. या प्रस्तावाला आज सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिल्याची माहिती बाजार उद्यान अध्यक्ष हाजी हालीम खान यांनी दिली.

इंदू मिलच्या १६ एकर जागेपैकी ११.४ एकर जागेवर स्मारक उभारले जाणार आहे. या जागेवर एकूण २५० विविध प्रकारची झाडे आहेत. यात आंबा, शेवगा, सोनमोहोर, फणस, गुलमोहोर, रामफळ, पिंपळ अशा झाडांचा समावेश आहे. त्यातील ११६ झाडे काढावी लागणार आहेत. तर १३४ झाडे आहेत तिथेच राहणार आहेत. केंद्र सरकारच्या वस्त्रद्योग विभागाने ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली आहे. स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू करण्यापूर्वी झाडे काढण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे.