अण्णा हजारेंशी संबंधित संस्थांकडून ‘आरटीआय’ची पायमल्ली, लोकजागृती सामाजिक संस्थेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासह इतर संस्थांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवून माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केली असल्याचा आरोप तालुक्यातील निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला आहे. देशातील जनतेला माहितीचा अधिकार मिळावा, यासाठी मोठा संघर्ष केलेल्या अण्णा हजारे यांच्याशी संबंधित संस्थांकडून पळवाट काढून माहिती दडवून ठेवली जात असल्याने धक्का बसल्याचे घावटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अण्णा हजारे यांच्याशी संबंधित असलेल्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास, स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी, हिंद स्वराज ट्रस्ट व आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्याकडून लोकजागृती संस्थेच्या वतीने या संस्थांचे गेल्या 10 वर्षांतील लेखापरीक्षण अहवाल व इतर माहिती मागविण्यात आली होती. मात्र, सरकारी अनुदान प्राप्त होत नसल्याने या संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचे कळविताना माहिती देण्यास नकार दिला असल्याचे घावटे यांनी म्हटले आहे.

राळेगणसिद्धी ग्रामपंचायत व श्री संत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेकडूनही माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्यापि उत्तर मिळाले नाही. एखाद्या संस्थेला किंवा शासकीय आस्थापनेला माहिती नाकारायची असेल, तर माहिती मागणाऱयाला तसे पत्र पाठवून नकार देण्याची कायद्यात तरतूद आहे.

‘संबंधित संस्थांचा कारभार अण्णा हजारे यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेवरील व्याजातून चालतो. तसेच ‘हिंद स्वराज्य ट्रस्ट’च्या माध्यमातून होणाऱया विविध प्रशिक्षण कार्यशाळांमधून काही निधी उपलब्ध होतो. संस्थांना कोणताही शासकीय निधी उपलब्ध होत नाही. या संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. केवळ बदनामीसाठी काही लोकांचे उद्योग सुरू आहेत.

– संजय पठाडे, कार्यकर्ता, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन.

नकार देताना आपण यावर समाधानी नसाल, तर दाद मागण्याची मुभादेखील ठेवली जाते; परंतु संबंधित संस्थांनी माहिती नाकारताना दाद मागण्याची संधी लोकजागृती सामाजिक संस्थेला दिली नाही. असे असले, तरी आपण संबंधित संस्थांविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार असल्याचे घावटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतील टँकर घोटाळ्यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुह्यातील काही संशयित राळेगणसिद्धी येथील उपरोक्त संस्थांचे पदाधिकारी आहेत. या संशयित आरोपींनी टँकर घोटाळ्यातील काही रक्कम उपरोक्त संस्थांकडे वळविली असल्याचा संशय लोकजागृती सामाजिक संस्थेला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांकडून माहिती मागविण्यात आली होती. हजारे यांच्या संस्थांमधील कारभार पारदर्शक असेल, असा सार्वत्रिक समज आहे. मात्र, या समाजाला धक्का बसला आहे. माहिती नाकारल्याने टँकर घोटाळ्यातील रक्कम संबंधित संस्थांकडे वळविल्याचा आमचा संशय बळावला आहे.’

– रामदास घावटे, अध्यक्ष, लोकजागृती सामाजिक संस्था.