नवे वर्ष महागाईचे? LPG, CNG सह वीमा प्रिमियमच्या किंमतींवरही होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत उत्साहात होतं. यंदाही हा उत्साह चांगलाच पाहायला मिळत आहे. पण येत्या वर्षातील नियोजन देखील अनेकांचा भर असतो. आपणही असं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

मोबाईल ही आता वस्तू नसून गरज बनली आहे. जवळपास सगळेच व्यवहार आता मोबाईलद्वारे केले जातात. अशा वेळी मोबाईल आणि सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या यांच्या संदर्भातील प्रत्येक माहिती आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. या नियमानुसार टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घेणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केलं आहे.

1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती देणे बंधनकारक असणार असल्याचं बोललं जात आहे.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी आणि सह इंधनाचे नवे दर जाहिर केले जातात. 1 जानेवारी 2024 ला LPG आणि CNG, PNG चे नवे दर जाहिर केले जातील. हे वर्ष लोकसभा निवडणुकांचं वर्ष आहे तेव्हा या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

करदात्यांसाठीही ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरते कारण ज्या करदात्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात आयकर परतावा भरलेला नाही त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत तो भरावा लागणार आहे. 31 डिसेंबर 2032 पर्यंत आयकर परतावा भरताना दंडही भरणे बंधन कारक असणार आहे. कर परतावा भरलेला नसल्यास 1 जानेवारी 2024 पासून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

बँक लॉकर नियमातही 1 जानेवारीपासून बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकरची नूतनीकरण प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नूतनीकरण प्रक्रियेत, लॉकर धारकाला नवीन बँक लॉकर करारावर आपली स्वाक्षरी करावी लागेल आणि संबंधित करार 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल.

सेबीने डीमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 दिली आहे. ज्या खातेदारांनी नॉमिनी जोडले नसतील त्यांच्यावर नवीन वर्षात कारवाई होण्याची शक्यता आहे. नॉमिनी नसलेली खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाण्याची शक्याताही वर्तवण्यात येत आहेत.

2024 मध्ये विमा प्रीमियम महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्यवेळी या संदर्भातील नियोजन केल्यास खिशाला फटका बसणार नाही.

नवीन वर्षात हवाई प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि सेवा देण्यावरील खर्च महागल्यानं विमान कंपन्या तिकिटावरील कर 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता बाजारात व्यक्त केली जात आहे.

शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर देखील कर वाढीची शक्यता असल्याने ही उत्पादने महागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.