आज केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प; लोकसभा निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून घोषणा करणार

केंद्रातील मोदी सरकार आज 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प 2024 जाहीर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात मोदी सरकार अनेक मोठया घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या दुस्रया कार्यकाळातील संसदेचे अखेरचे अधिवेशन आज बुधवारपासून सुरू झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आणि नंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहता येईल. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा केली जाणार नाही असे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी यापूर्वी सांगितले होते. परंतु, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अनेक मोठय़ा घोषणा होऊ शकतात. यात पीएम किसन अंतर्गत वितरणात 6 हजार रुपयांवरून 9 हजार रुपयांपर्यंत वाढ, मनरेगा योजनेसाठी वाढीव निधीचे वाटप यांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर कर सवलतींची अपेक्षा असून कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला समर्थन देण्याच्या दृष्टीने घोषणा होऊ शकतात.

मोबाइल स्वस्त होणार

अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारने मोबाईल पह्न बनवण्यासाठी वापरल्या जाणाया पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केले असून आता 15 टक्क्यांऐवजी केवळ 10 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे माबाइल स्वस्त होणार आहे. हिंदुस्थानची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः निर्यात वाढवण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. बॅटरी कव्हर, मुख्य लेन्स, बॅक कव्हर, प्लास्टिक, धातू, सिम सॉकेट, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉडयूल, यांत्रिक वस्तू या पार्ट्सवरील आयातशूल्क कमी करण्यात आले आहे.

देश प्रगतीपथावर

राम मंदिर उभारणी तिहेरी तलाक बंदी, 370 कलम रद्द करण्याचा निर्णय यांसह आर्थिक सुधारणा हा सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील साधनेचा परिपाक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसद भवनात केलेल्या आपल्या पहिल्याच अभिभाषणात केले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपतींनी आज लोकसभेच्या सभागृहात जमलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर केलेल्या सवा तासाच्या भाषणात, पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांच्या संदर्भात दहशतवाद आणि विस्तारवादाला चोख प्रत्युत्तर देणाऱया सशस्त्र दलांची वाखाणणी केली.